मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल झाले आहे. खबरदारी म्हणून अजित पवार यांना रुग्णालयात अॅडमिट केल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. थकवा जाणवत असल्याने अजित पवार गेल्या चार दिवसांपासून होम क्वॉरन्टाईंन होते. महत्त्वाचं म्हणजे त्यांची कोरोना चाचणीही निगेटिव्ह आली आहे.


अजूनही त्यांना त्रास जाणवत असल्याने त्यांना खबरदारी म्हणून त्यांना आज सकाळी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल केल्याचं निकटवर्तीयांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या प्रकृतीविषयी अधिकृत माहिती देण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी अजित पवार मागील आठवड्यात पुणे, इंदापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना थोडा थकवा जाणवत होता. तरीही त्यांनी शनिवारी (17 ऑक्टोबर) बारामती, इंदापूर, सोलापूर परिसरात जाऊन नुकसानीची पाहणी करुन नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. हा दौरा आटोपून परतल्यानंतर त्यांना तापही आला होता. त्यामुळे कोरोना चाचणी केली. ती निगेटिव्ह आली असली तरी थकवा असल्याने त्यांनी घरीच राहून  आराम करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु अजूनही थकवा असल्याने खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे.


अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह असल्याची चर्चा, पार्थ पवारांकडून खंडन
दरम्यान अजित पवार होम क्वॉरन्टाईन झाल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केलं होतं. मात्र अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी या वृत्ताचे खंडन केलं. अजित पवारांना कोरोनाची लागण झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अजित पवारांची थकवा आला आहे, थोडा ताप आहे. मात्र त्यांनी कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आली आहे, असं पार्थ पवार यांनी सांगितलं होतं.


संबंधित बातम्या


अजित पवारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती खोटी, पार्थ पवारांकडून वृत्ताचं खंडन


अजित पवार होम क्वॉरन्टाईन, मात्र व्हिसीद्वारे बैठकीला हजर राहणार!