मुंबई : माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी तडकाफडकी राजकीय निवृत्ती (Politics) जाहीर केल्यानंतर, मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजप नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्यासोबतच्या मतभेदातून निलेश राणे (Nilesh Rane) यांनी सक्रीय राजकारण सोडल्याची चर्चा होती. त्यामुळे आज रवींद्र चव्हाण यांनी स्वत: निलेश राणे यांची त्यांच्या मुंबईतील घरी जाऊन भेट घेतली. जवळपास दीड-दोन तास दोघांमध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. 


रवींद्र चव्हाण निलेश राणेंच्या भेटीला


रवींद्र चव्हाण म्हणाले, "निलेश राणे यांनी ट्विट केल्यानंतर नेमकं काय घडलं हे कळत नव्हतं. आम्ही याबाबत नारायण राणे (Narayan Rane) यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. संघटनेत काम करत असताना कार्यकर्त्यांवर अनन्या होऊ नये ही सर्वांची भावना आहे."


छोट्या कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घ्यायला हव्यात असं त्याचं म्हणणं होतं. याबाबत आम्ही चर्चा केली. निलेश राणे यांनी रागावून निर्णय घेतला होता. आता मी स्वतः या विषयात लक्ष घालणार आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांची कामे केली जातील. मी आग्रह केला असा निर्णय घेऊ नका. ज्या अडचणी आहेत त्या समजून घेऊ.


आम्ही सर्वजण पक्षासाठी काम करत आहोत. लोकसभा विधानसभा निवडणुका लढत असताना कार्यकर्त्यांना कोणतीही अडचण येऊ नये याची खबरदारी घेतली जाणार आहे, असं रवींद्र चव्हाण म्हणाले.


राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय


भाजपचे नेते (BJP) आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी अचानकपणे राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. निलेश राणे यांनी मंगळवारी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करत आपण निवृत्ती जाहीर करत असल्याचं म्हटलं. निलेश राणे यांनी एवढा मोठा निर्णय तडकाफडकी घेण्यामागचं कारण इतर नेते असल्याचं म्हटलं जात होतं. नितेश राणे रविंद्र चव्हाण यांच्यावर नाराज असल्याने त्यांनी राजकीय निवृत्तीचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र असलेले निलेश राणे माजी खासदार राहिले आहेत. पण सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या राजकारणात इतरांची जास्त ढवळाढवळ होत असल्यानं केल्या काही दिवसांपासून त्यांचे भाजपच्या नेत्यांसोबत खटके उडत होते. निलेश राणे यांनी राजकीय निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर आता भाजपचे बडे नेते निलेश राणे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करताना दिसले.