मुंबई : मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकं प्रकरणाचा तपास आधी एनआयएकडे गेला. यादरम्यान या प्रकरणाचे तपास अधिकारी सचिन वाझेच आरोपी झाले आणि त्यांना अटक करण्यात आली. आता मनसुख हिरण मृत्यू प्रकरण एनआयएकडे जाणं हा ठाकरे सरकारसाठी मोठा सेटबॅक असल्याचं म्हटलं जात आहे. कशाप्रकारे हळूहळू ठाकरे सरकारच्या हातून ही केस निसटत गेली याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट.
मनसुख हिरण मृत्यू प्रकरणही आता एनआयनएकडे तपासासाठी गेलं. याआधी मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडी प्रकरणाचा तपासही एनआयए करत होतं. आधी या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाकडून केला जात होता. मात्र सचिन वाझे यांच्यावर मनसुख यांच्या मृत्यूप्रकरणी संशय व्यक्त केला केल्यानंतर आता हा तपास एनआयएकडे गेला आहे.
मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरण मृत्यू प्रकरण हे एकमेकांशी निगडित होतं, त्यामुळे मनसुख हिरण मृत्यू प्रकरणाचा तपास सुद्धा एनआयएकडे जाणं जवळपास निश्चितच होतं. मात्र आज अधिकृतरित्या हा तपास त्यांच्याकडे गेला.
ठाकरे सरकारला प्रत्येक पावलावर कशाप्रकारे हळूहळू या केसचा सेटबॅक बसत गेला?
- स्फोटकं सापडल्या प्रकरणी ही केस क्राईम ब्रान्च किंवा दहशतवाद विरोधी पथकाला देणं गरजेचं होतं मात्र ही केस क्राईम इंटेलिजन्स युनिटला देण्यात आली.
- विधानसभेत गदारोळ माजला आणि सचिन वाझे यांच्याकडून ही केस काढली. त्यांच्याजागी क्राईम ब्रान्चचे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन अल्कनुरे यांना या केसचा मुख्य तपास अधिकारी म्हणून नेमण्यात आलं.
- क्राईम ब्रान्च या प्रकरणाचा तपास करत असतानाच यामधील मुख्य दुवा असलेले मनसुख हिरण यांच्या मृत्यूची माहिती मिळाली.
- दोन्ही प्रकरणांचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला. मात्र मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणाचा तपास फक्त चौदा तासांसाठी दहशतवाद विरोधी पथकाकडे होता, त्यानंतर हा तपास एनआयएने आपल्या अखत्यारित घेतला.
- एनआयएने सचिन वाझे यांना चौकशीसाठी बोलावण्याआधीच सबळ पुरावे गोळा केले होते. त्यानंतर तेरा तासांच्या चौकशीनंतर सचिन वाझे यांना अटक केली. तर सचिन वाझे यांना त्यांच्या पोलीस दलाच्या करिअरमध्ये दुसऱ्यांदा निलंबित करण्यात आलं.
- याशिवाय मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सुद्धा चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता होती आणि जर अस झालं असत तर सरकारची आणि मुंबई पोलीस दलाच्या प्रतिमेला अजून धक्का बसला असता. त्यामुळे परमबीर सिंह यांची आयुक्त पदावरुन उचलबांगडी करण्यात आली.
- मनसुख हिरण मृत्यू प्रकरणात दहशतवादी विरोधी पथकाला सचिन वाझे यांच्यावर संशय होताच तर आता एनआयएकडे हे प्रकरण गेल्यानंतर सचिन वाझे यांच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.