मुंबई : मुंबईच्या मिठी नदीत सापडलेलं सारं साहित्य म्हणजे एनआयएने स्वतः निर्माण केलेला एक बनाव असल्याचा खळबळजनक आरोप शनिवारी सचिन वाझे यांच्यावतीनं विशेष एनआयए कोर्टात केला गेला. तसेच आपल्याला हृदयरोगाचा आजार असून रविवारी एक स्ट्रोक आल्याची माहितीही वाझेंनी स्वत:हून न्यायालयाला दिली. त्याची दखल घेत न्यायालयाने पुढील सुनावणीदरम्यान वाझेंचा वैद्यकीय चाचणी अहवाल न्यायालयात सादर करण्याचे निर्देश देत वाझे यांना 7 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावली. शनिवारी सचिन वाझे यांची कोठडी संपत असल्याने त्यांना न्यायाधीश प्रशांत सित्रे यांच्यासमोर हजर करण्यात आलं होतं. 


काय होता एनआयएचा युक्तिवाद


25 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत एनआयएनं केलेल्या तपासात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. बऱ्याच गोष्टी हस्तगत करण्यात यश आलं आहे. मिठी नदीच्या गाळातून कॉप्युटर, लॅपटॉप, हार्डडिस्क, सीसीटीव्हीचा डीव्हीआर, गाडीच्या नंबर प्लेट्स इ. साहित्य हाती लागले आहे. तर डीसीबी बँकेच्या वर्सोवा शाखेमध्ये एका व्यक्तीसोबत वाझेंचे संयुक्त खातं आहे. वाझेंना अटक होताच त्या खात्यातील जवळजवळ 26 लाख 50 हजार रूपये काढण्यात आले. तसेच त्याच शाखेत या खात्याशी संलग्न असलेला लॉकरही त्यादिवशी उघडण्यात आला होता. आता त्या खात्यात केवळ 5 हजार रूपये शिलल्क असून लॉकरमध्येही केवळ काही नाममात्र कागदपत्र उरली आहेत. तसेच एका अनोखळी व्यक्तीचा पाटपोर्टही वाझेंच्या घरी सापडला असल्याची माहितीही एनआयएच्यावतीने अतिरिक्त सॉलिलिटर जनरल अनिल सिंह यांनी दिली. त्याला जोरदार विरोध करत मिठी नदीत सापडलेलं सारं साहित्य म्हणजे एनआयएने स्वतः निर्माण केलेला एक बनाव आहे. तसेच डीसीबी बॅंकेत वाझेंचे कुणासोबतही संयुक्तरित्या खाते नाही असा दावा वाझेंच्यावतीनं करण्यात आला. मात्र, एनआयएनं त्या खात्यासंदर्भात सारी कागदपत्र असल्याचं सांगत हा विरोध खोडून काढला. तसेच वाझेंवर युएपीए कायद्यांतर्गत कलम लावण्यात आली असून त्यासंबंधित तब्बल 120 टीबीचे सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करण्यात आले आहे. त्या फुटेजमध्ये वाझे मागील काही दिवसात कुठे गेले? कोणाला भेटले? का भेटले?, स्फोटकांचे सामान कसं गोळा केल?, याचा तपास सुरू असून दुसरीकडे सीसीटीव्हीमधील वाझेंचा संशयास्पद वावर तसेच मिठी नदीच्या पात्रात सापडलेल्या सामानातून डेटा परत मिळवून वाझेंची अधिक चौकशी होणं गरजेचं असल्यानं कोठडी वाढवून देण्यात यावी, अशी मागणी एनआयएच्यावतीनं  न्यायालयात केली गेली.


दरम्यान कोर्टानं जेव्हा वाझेंना प्रथेप्रमाणे आरोपीला काही त्रास आहे का?, असं विचारलं तेव्हा आपल्याला हदयरोगाचा आजार असून रविवारी एक स्ट्रोक आल्याचं वाझेंनी न्यायालयाला सांगितलं. तसेच आपल्या शरीरात ब्लॉकेज तयार झाले असून तातडीनं अँजिओग्राफी करणं आवश्यक असल्याची माहिती वाझेंच्यावतीनं देण्यात आली. मात्र एनआयएनं हा दावा नाकारत वाझेंना योग्य ते उपचार मिळत आहेत, ताब्यात घेतल्यापासून दोनदा त्यांची 2 डी इको, रक्त चाचणी, इसीजी चाचणीही करण्यात आली असून वाझेंची प्रकृती ठणठणीत असल्याचं त्यांनी कोर्टाला सांगितलं.


प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' या निवासस्थानाबाहेर 20 जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचं पत्र ठेवलेली एक स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आली होती. तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेन यांच्या अनाचक झालेल्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आली आहे. शनिवारच्या सुनावणीदरम्यान सचिन वाझेंचे बंधू सुधर्म यांनी वाझेंना भेटण्यासाठी पाच मिनिटांचा वेळ न्यायालयाने मागितला. त्यांची मागणी मान्य करत कोर्टानं अधिकाऱ्यांच्या उपस्थितीच त्यांना भेटण्याची परवानगी दिली. संपूर्ण सुनावणीदरम्यान सुधर्म हे न्यायालयात हजर होते. आपला एनआयए आणि न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास असल्याची प्रतिक्रिया सुनावणी संपल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यामांशी बोलताना दिली.