मुंबई : मनसेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश एसटीएफने मोठा खुलासा केला. एक पत्रकार परिषद घेऊन एसटीएफने मनसे नेते जमील शेख यांच्या हत्येप्रकरणी लखनौमधून एकाला अटक केल्याचे सांगितले.
युपी पोलिसांनी दिलेल्या प्रेस नोट मध्ये ठाण्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांचे नाव आहे. पण, नजीब यांच्याशी फोन वर संपर्क साधला. "माझे या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, मला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, महाराष्ट्र पोलिसांच्या चौकशीत सत्य समोर येईल", असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला हा आरोपी गोरखपूरमधील रहिवासी असून इरफान सोनू शेख मंसूरी उर्फ राजधनिया असे त्याचे नाव आहे. जवळपास पाच महिने तो फरार होता. युपी एस टी एफ ने दिलेल्या माहितीनुसार, विभूती खंड पोलिस स्टेशन परिसरातील कठौता तलावाजवळ एसटीएफने इरफानला पकडले.
जमील यांची 23 नोव्हेंबर 2020 मध्ये राबोडी मध्येच गोळी मारून हत्या करण्यात आली होती. हत्येची संपूर्ण घटना परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. जमील शेख हे बाइकवरुन निघाले होते. त्यावेळी पाठीमागून बाइकवर आलेल्या दोन जणांपैकी मागे बसलेल्या एकाने जमील यांच्यावर गोळी झाडली. डोक्याच्या मागे गोळी लागल्याने जमील यांची अवस्था गंभीर होती, त्यातच हॉस्पिटलच्या वाटेवर त्यांचा मृत्यू झाला. जमील अहमद शेख यांच्या हत्येनंतर ठाणे क्राईम ब्रांच पोलिस पाच महिने आरोपीच्या शोधात होते.
ठाण्यातील मनसे नेत्याची हत्या करणाऱ्या शूटरला लखनौमध्ये युपी पोलिसांची अटक
सदर गुह्याच्या तपासासाठी मागिल अनेक महिन्या पासून ठाणे गुन्हे शाखेचे अधिकारी उत्तर प्रदेश मधे ठान मांडून बसले आहेत. आता अटक केलेल्या आरोपीला ताब्यात घेवून ठाण्यात आल्यावर आणाखी पुढे तपास होणार आहे. दरम्यान युपी पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती मिळाल्यानंतर ठाण्यातील राबोडी परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांनी दंगल नियंत्रक पथक तैनात केले होते. काही वेळाने हा तणाव शांत झाला.