मुंबई : मुंबईतील मालवणी भागात नवदाम्पत्याने आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास राहत्या घरी पती-पत्नीने गळफास घेतला.


24 वर्षीय धनराज भुवनेश्वरलाल नाई याचं लग्न तीन महिन्यांपूर्वी 19 वर्षीय काजलशी झालं होतं. लग्नानंतर काही काळ बेरोजगार असल्यामुळे धनराजने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय आहे. मुंबईतल्या मालाडमधील मालवणी भागात हा धक्कादायक प्रकार घडला.

घरात सर्वजण असताना दुसऱ्या रुममध्ये दाम्पत्याने छताला गळफास घेऊन आयुष्य संपवलं. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तात्काळ त्यांना मालवणीतील रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना तत्पूर्वीच मृत घोषित केलं. मालवणी पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.