मुंबई : केवळ 22 आठवडेच आईच्या गर्भाची ऊब मिळालेलं आणि 610 ग्रॅम इतकं कमी वजन असणाऱ्या बाळाला आज रुग्णालयातून सुखरुप आपल्या घरी नेण्यात आलं. हा चमत्कार नाही तर सांताक्रुझमधील रितीका आणि विशाल या दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेल्या निर्वाणची ही सत्यकथा आहे. सर्वात कमी दिवसांची वाढ असणारं, तरीही सुदृढ असणारं भारतातलं पहिलं बाळ म्हणून आता निर्वाणला ओळखलं जात आहे.


अगदी तळहातावर मावेल एवढा जीव, वजन 610 ग्रॅम, लांबी 32 सेमी, डोक्याचा आकार 22 सेमी आणि आईच्या गर्भातली केवळ 22 आठवड्यांची ऊब. पण याच निर्वाणला आज एक सामान्य आयुष्य मिळालं आहे.

मुंबईतील सूर्या हॉस्पिटलमध्ये मे महिन्यात पाच महिन्यांच्या गर्भवती असणाऱ्या रितीका दाखल झाल्या आणि प्रसुती कक्षात दाखल होताच अगदी काही क्षणांतच त्यांची प्रसुतीही झाली.

जन्मानंतरचा निर्वाणचा प्रवास सोपा नव्हता. निर्वाणला 12 आठवडे श्वसनासाठी मदत द्यावी लागली. यांपैकी 6 आठवडे तो व्हेंटीलेटरवर होता. निर्वाणची फुफ्फुसेही अपरिपक्व होती. या काळात त्याच्या मेंदूतही रक्तस्त्राव झाला. मात्र असंख्य अडचणींवर मात करत, मृत्युशी झुंजत निर्वाणनं सगळ्या संकटांना पार केलं आहे.

आता निर्वाणचं वजन 3.72 किलो इतकं आहे. लांबी 50 सेमी आहे. तसंच तो इतर सामान्य मुलांप्रमाणे जगू शकतो.

भारतात अपुऱ्या दिवसांच्या बाळांचं जगण्याचं प्रमाण नगण्य असताना निर्वाणची यशस्वी ठरलेली केस वैद्यकिय क्षेत्रात महत्वाची मानली जाते आहे.

आईच्या गर्भात केवळ 22 आठवडे एवढ्या अपुऱ्या दिवसांची वाढ असलेला निर्वाण हा भारतातला पहिला मोस्ट प्रिमॅच्युअर बेबी आहे. आणि म्हणूनच आज निर्वाणला ‘मिरॅकल बेबी’ म्हणूनही ओळखलं जात आहे.

पाहा स्पेशल रिपोर्ट :