मुंबई: रुग्णालयात अनामत रक्कम म्हणून पाचशेच्या नोटा न स्वीकारल्यानं एका नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे. मुंबईतल्या गोवंडीमधील जीवन ज्योत हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली. मयत नवजात बालकाचे वडील जगदीश शर्मा यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.  पोलिसांनी त्यांना मेडिकल कौंसिलकडे नोटीस द्या, असा सल्लाही दिला आहे.

नवजात बालक कमी दिवसांचं असल्यानं त्याची तब्येत गंभीर होती. अशावेळी रुग्णालय प्रशासनानं 6 हजार रुपये डिपॉजिट करायला सांगितले. मात्र, हजार-पाचशेच्या नोटा बंद झाल्यानं जगदीश शर्मा यांच्याकडे 100च्या नोटा नव्हत्या आणि त्यामुळेच रुग्णालयानं उपचार नाकारल्यानं या बालकाचा मृत्यू झाला आहे.

आरोग्यमंत्र्यांनी दोनच दिवसांपूर्वी रुग्णालयात हजार पाचशे नोटा स्वीकारा. असे आदेश देऊनही रुग्णालय प्रशासनाची मुजोरी थांबत नाही. त्यामुळे या रुग्णालयावर काय कारवाई होणार ते पाहावं लागेल.

डॉ. शीतल कामतांनी आरोप फेटाळले

दरम्यान, याप्रकरणी डॉ. शीतल कामत यांनी हे आरोप फेटाळले आहेत. 'बाळाला एनआयसीयूमध्ये ठेवण्याची गरज होती. पण ती व्यवस्था आमच्याकडे उपलब्ध नसल्यानं मी बाळाला आणि त्याच्या आईला सायन हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला. पण बहुदा त्यांनी तसं न करता बाळाला घरी नेलं असावं.' असं डॉ. कामत म्हणाल्या.