मुंबई: ५०० आणि हजाराच्या नोटा बदलण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी देशभरातील बँका आज आणि उद्या अर्थात दुसऱ्या शनिवार आणि रविवारीही खुल्या राहणार आहेत. त्यामुळे आज आणि उद्याही बँकांसमोर रांगा लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काल एटीएम उशीरानं उघडल्यानं नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. काल उशीरा उघडलेल्या एटीएमवर अनेकांच्या उड्या पडल्या. त्यामुळे एटीएममधली कॅश संपल्यानं अनेक ठिकाणची एटीएममध्ये अक्षरश: खडखडाट झाल आहे. यामुळे ऐन सकाळी अनेकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. दरम्यान, आज तरी एटीएम सुरळीत चालणार का? याकडे सर्व डोळे लावून बसले आहेत.
दुसरीकडे जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा वापरण्यासाठी केंद्र सरकारनं 14 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्यानं नागरिकांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पेट्रोल पंप, रेल्वे, विमान, मेट्रो तिकीट, रुग्णालयं, वीज बिल भरणा केंद्र, शासकीय कर भरण्यासाठी आता जुन्या नोटा वापरता येणार आहेत. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.