मुंबई : मालाडमध्ये स्तनपान करणाऱ्या महिलेची गाडी टो करुन नेणाऱ्या पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. मात्र आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात टोईंगवेळी महिलेकडे तिचं बाळ नसल्याचं स्पष्ट दिसतं आहे. दरम्यान शनिवारी व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर वाहतूक पोलिसाचं निलंबन करण्यात आलं आहे.

या नव्या व्हिडिओत टोईंगवेळी महिला कारमध्ये दिसत आहे, तर तिचं बाळ कारबाहेर असलेल्या तिच्या पतीच्या हातात दिसत आहे. पतीनं पोलिसांसोबत हुज्जत घातल्याचंही या दुसऱ्या व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर त्यानं हे बाळ महिलेच्या हातात दिलं. त्यामुळे या प्रकारात पोलिसांची चूक आहे की कारचालकाचा कांगावा हा प्रश्न उपस्थित होत आहे.

शनिवारी व्हायरल झालेल्या व्हिडिओत मालाडमध्ये नो पार्किंग झोनमध्ये एक कार उभी करण्यात आली होती. कारमालक काही कामानिमित्त बाहेर गेला होता, तर या कारमध्ये ड्रायव्हरच्या सीटमागे महिला (त्याची पत्नी) आपल्या सात महिन्याच्या लेकराला दूध पाजत बसली होती. मात्र वाहतूक पोलिसांनी बळजबरीनं ही कार टो करुन नेली.

कारमध्ये महिला लेकराला दूध पाजताना पोलिसांकडून टोईंग

विशेष म्हणजे, हा व्हिडिओ काढणारा युवक वाहतूक पोलिसांना कार ओढून नेऊ नका, अशी विनंती करत होता. कारमध्ये एक महिला बाळाला दूध पाजत आहे, म्हणून किमान गाडी सावकाश ओढा, असंही ओरडून सांगत होता. मात्र त्याचं काहीएक ऐकता वाहतूक पोलिस कार ओढून नेत होते.

इतकंच नाही, तर महिला दंड भरण्यास तयार आहे, असंही तो सांगत होता. शशांक राणे असं वाहतूक पोलिस अधिकाऱ्याचं नाव असल्याचं युवक बोलताना व्हिडिओत ऐकू येत होतं. या टोईंगप्रकरणी ट्रॅफिक कॉन्स्टेबल शशांक राणेला निलंबित करण्यात आलं आहे.

महिलेवक कारवाई व्हावी : महिला आयोग

दरम्यान मुंबईच्या मालाडमधील टोईंगप्रकरणी आईवर कारवाई व्हावी, असं मत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी व्यक्त केलं. आईनं 7 महिन्याच्या बाळाचा जीव धोक्यात घातला असून तिच्या बेजबाबदारपणामुळे तिच्यावर कारवाई व्हावी असं महिला आयोगानं म्हंटलं आहे.