नागपूर : ठाणेकरांसाठी खुशखबर आहे. मध्य रेल्वेवरील नवीन स्थानकाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकाच्या दरम्यान नवीन रेल्वे स्थानक होणार असल्याची माहिती ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

कॅबिनेटच्या बैठकीत 290 कोटी रुपयांच्या तरतुदीला मान्यता मिळाली आहे. मुलुंडजवळ असलेल्या मनोरुग्णालयाची जागा या नवीन स्टेशनसाठी आरोग्य खात्याकडून देण्यात येणार आहे.

यापैकी 260 कोटी 'स्मार्ट सिटी'च्या निधीतून तर 30 कोटी रुपये ठाणे महापालिकेतून देण्यात येणार आहेत.  त्या मोबदल्यात ठाणे महापालिकेकडून मनोरुग्णालयाच्या निर्मितीसाठी दुप्पट टीडीआर देण्यात येईल.

ठाणे रेल्वे स्थानक आणि परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून गेली अनेक वर्षे ठाणे आणि मुलुंड यांच्या दरम्यान विस्तारित ठाणे स्थानक बांधण्याची मागणी शिवसेना करत आहे. दीडशे वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या ठाणे स्थानकाची क्षमता संपली असून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असल्यामुळे दुर्घटना घडण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत होती.

शिवसेना आणि महापालिकेच्या पाठपुराव्यानंतर रेल्वेने हा प्रकल्प करण्यास मान्यता दिल्यानंतरही आरोग्य विभागाच्या मालकीची जागा न मिळाल्यामुळे हा प्रकल्प पुढे सरकला नव्हता