मुंबई : जर तुम्ही खासगी लॅबमधून कोरोना चाचणी केली असेल तर त्याचा रिपोर्ट तुम्हाला खासगी लॅब नाही तर मुंबई महापालिका कळवणार आहे. रुग्णाचा कोविड रिपोर्ट जर पॉझिटीव्ह असेल तर तो त्याला न कळवता थेट महानगरपालिकेला कळवण्याचा आदेश महानगरपालिकेने जारी केला आहे. पण, या आदेशावर आता अनेक प्ररश्नचिन्ह उभी राहतायेत. खासगी लॅबकडून थेट रुग्णाला रिपोर्ट न कळवता महापालिकेला रिपोर्ट देण्यामागे रुग्णसंख्या लपवण्याचा हेतु तर नाही ना? असे प्रश्न आता विरोधकांकडून उपस्थित होत आहेत.


राज्यात कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईत कोरोना रुग्णांच्या आकडेवारीवरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कुरघोडी सुरु आहेत. मुंबईतल्या कोरोना मृतांचे आकडे दडवले असल्याचा आरोपही विरोधी पक्ष भाजपने केला आहे. त्यानंतर आता आणखी एक वाद सत्ताधारी आणि विरधकांमध्ये सुरू झालाय. तो म्हणजे महापालिकेनं कोरोना रिपोर्ट थेट रुग्णाला न कळवण्यासंबंधी जारी केलेल्या एका परिपत्रकावरुन.


काय आहे पालिकेचं नवं परिपत्रक

  • रुग्णाचा कोविड रिपोर्ट जर पॉझिटीव्ह असेल तर तो त्याला न कळवता थेट महानगरपालिकेला कळवण्याचा आदेश महानगरपालिकेने जारी केलाय. मात्र, रुग्णाचा रिपोर्ट निगेटीव्ह असेल तर तो रुग्णाला परस्पर कळवला तरी चालेल.

  • रिपोर्ट महापालिकेला प्राप्त झाल्यानंतर संबंधित यंत्रणा रुग्णापर्यंत ही माहिती पोहोचवेल. मात्र, या नव्या परिपत्ररकावर विरोधकांनी काही प्रश्न उपस्थित केलेत.

  • थेट रुग्णांना रिपोर्ट न कळवण्याच्या नव्या परिपत्ररकाबाबत कोणते आक्षेप आहेत?

  • स्वतःचा रिपोर्ट मिळणे हा रुग्णाचा अधिकार कसा काय हिरावून घेऊ शकता?

  • महानगरपालिकेची एकूणच कामाची पद्धत पाहता, त्या पॉझिटीव्ह रुग्णाला उपचार मिळण्यास दिरंगाई झाली आणि त्याच्या जीवितास धोका निर्माण झाला तर जबाबदारी कोणाची?

  • रुग्णांची संख्या कमी दाखवण्याचा हा प्रयत्न तर नाही ना?


कोरोनाची लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना खासगी रुग्णालयांनी भरती करुन घेऊ नये : राजेश टोपे
महापालिका प्रशासनाचे स्पष्टीकरण काय?

  • यासाठी मुंबई महापालिकेच्या प्रत्येक वॉर्ड मध्ये 24 तास चालणाऱ्या वॉर रुम तयार केली आहे.

  • वॉर रुममधील डॉक्टरांमार्फत अहवालाच्या माहितीसोबतच इतर वैद्यकिय सुविधांबाबत रुग्णाला सूचना देतात.

  • तसंच, संबंधीत रुग्णाला गरजेनुसार हॉस्पिटल रुग्णणवाहिकेची सुविधा महापालिकेकडून देण्यात येते.

  • काही खासगी लॅब कोरोना रिपोर्ट देण्यात दिरंगाई करतात. त्यामुळे हा नियम करण्यात आल्याचा महापालिकेचा दावा आहे.


मात्र, पॉझिटिव्ह रुग्णाला उपचार मिळण्यास दिरंगाई झाली आणि त्याच्या जीवितास धोका निर्माण झाला तर जबाबदारी कोणाची? कोरोना रुग्णांची संख्या कमी दाखवण्याचा हा प्रयत्न तर नाही ना अशी शंका मनसेनं उपस्थित केलीय.


या आरोपांना उत्तर देताना रुग्णालात जलदगतीनं वैद्ययकिय सेवा मिळावी आणि खासगी लॅब-महापालिका आणि रुग्णांमधील समन्वय साधला जावा यासाठीच ही व्यवस्था केल्याचं पालिकेचं म्हणणं आहे.



आधीच कोरोनामुळे नेमके किती मृत्यू झाले? मृतांच्या आकड्यात काही फेरफार आहे का? या प्रश्नांची नेमकी उत्तरं मिळालेली नाहीत. त्यात पॉझिटीव्ह रिपोर्टची माहिती रुग्णांआधी प्रशासनाला देण्यामागे आणखी काही काळबेरं तर नाही यावर शंका उपस्थित होणं स्वाभाविकच आहे.