एक भलामोठा कुत्रा ज्याला सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेली शंका असं संबोधून, तो कुत्रा अमित शाहांच्या मागे लागला आहे, असं राज ठाकरेंनी व्यंगचित्रात रेखाटलं आहे. त्याच्या बाजूला न्यायमूर्ती लोया यांची कबर दाखवली आहे. त्यावर गाडले गेलेले ज. लोया प्रकरण असं लिहून, राज ठाकरे यांनी या कार्टूनला कबरची खबर असं म्हटलं आहे.
राज ठाकरे यांनी या व्यंगचित्रासोबत एक पोस्टही लिहिली आहे. ती पोस्ट जशीच्या तशी-
“मी मागे म्हणल्याप्रमाणे, गेल्या एका महिन्यांत अनेक घडामोडी घडल्या, त्याच्यावरच्या माझ्या व्यंगचित्रांचा बॅकलॉग (अनुशेष) शिल्लक होता.
सध्याच्या सरकारचं कर्तृत्वच असं की व्यंगचित्रकारांना विषयांची कमतरता जाणवूच शकत नाही.
९ जानेवारी २०१८ च्या माझ्या पोस्टमध्ये मी म्हणलं तसं 'अनुशेष' शिल्लक ठेवणाऱ्यातला मी नाही. १९ जानेवारीला 'हजयात्रेच्या अनुदानावरचं' किंवा २३ जानेवारीचं ‘गुजरात निवडणुक’ निकालांवरचं व्यंगचित्र तुम्ही पाहिलं असेलच.
पण तरीही अनेक विषयांवर तडाखे द्यायचे बाकी आहेत. त्यातलेच काही माझे 'फटकारे'. तुम्हाला ते आवडतील आणि तुम्ही त्यातून योग्य तो बोध घ्याल अशी मी आशा करतो”.