ठाणे : नेपाळ येथे झालेल्या बेपत्ता झालेल्या विमानाचा अपघात झाल्याचं स्पष्ट झालं असून त्यामध्ये ठाण्यातील त्रिपाठी कुटुंबीय प्रवास करत असल्याची माहिती समोर येत आहे. त्रिपाठी कुटुंबीय 10 दिवसाची सुट्टी काढून फिरण्यासाठी नेपाळ येथे गेले होते. तिथेच झालेल्या विमान अपघातात त्रिपाठी कुटुंब बेपत्ता आहे. 


अशोक त्रिपाठी (54), वैभवी बांधिवडेकर (51), मुलगा धनुष त्रिपाठी(22) आणि मुलगी ऋतिका त्रिपाठी(18) हे अजूनही विमानसह बेपत्ता आहेत. नेपाळच्या पोखरा येथून त्यांनी अन्य ठिकाणी जाण्यासाठी विमान पकडले. मात्र खराब हवामानामुळे विमानाचा अपघात झाल्याची माहिती नेपाळच्या प्रशासनाने दिली आहे. 


त्रिपाठी कुटुंब हे ठाण्यातील रुत्सुमजी येथे वात्सव्यास आहे. त्रिपाठी पती, पत्नी यांचा घटस्फोट झालेला असून कोर्टाच्या निर्देशावरून 10 दिवस सुट्टी काढून ते परिवारासह फिरायला जात असत. यावेळी ते नेपाळला भक्तिधाम येथे गेले होते. या संदर्भात स्थानिक पोलीस आणि त्रिपाठी यांचे कुटुंब भारतीय दुतावासाच्या संपर्कात असल्याची माहिती कापुरबावडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे यांनी दिली. सध्या त्रिपाठीच्या घरी त्यांच्या पत्नीची आई आणि बहीण राहत असून त्यांची देखील तब्बेत खालवली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


बेपत्ता विमानाचे अवशेष सापडले
नेपाळमध्ये पोखरा ते जोमसोम या ठिकाणी जात असलेल्या बेपत्ता विमानाचे अवशेष सापडल्याची माहिती समोर आली आहे. नेपाळमधील मुस्टांग या ठिकाणी या विमानाचे अवशेष सापडले असून बचाव पथक त्या ठिकाणी पोहचत असेल. या विमानामध्ये एकूण 22 प्रवासी प्रवास करत होते, त्यामधील चार प्रवासी हे भारतीय होते. 


ही माहिती मिळताच त्या ठिकाणी बचाव पथक रवाना झालं आहे. पण खराब हवामानामुळे या ठिकाणी पोहोचण्यास बचाव पथकाला अडचणी येत असल्याची माहिती आहे. त्याआधी जोमसोम एअरपोर्टच्या ट्रॅफिक कंट्रोल विभागाने सांगितलं होतं की त्यांना एका मोठ्या धमाक्याचा आवाज ऐकू आला. पण त्यांची त्यांना पृष्टी करता आली नव्हती. धमाका ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी हेलिकॉप्टर पाठवण्यात आलं होतं. ज्या ठिकाणी धमाका झाला त्याच ठिकाणी त्या विमानाचा शेवटी संपर्क तुटला होता.