मुंबई: मुंबईत भरदिवसा अंधारुन येऊन, वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सकाळपासून पावसाचं अजिबात वातावरण नव्हतं. मात्र दुपारी 2 च्या सुमारास अचानक अंधारुन आलं आणि पावसाला सुरुवात झाली.
संध्याकाळी सात-साडेसातच्या सुमारास जसं वातावरण असतं, अगदी तसंच वातावरण दुपारी दोन वाजता पाहायला मिळालं.
मुंबईतील दादर, वरळी, लालबाग, वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, तिकडे ठाणे, डोंबिवली भागात जोरदार सरी कोसळल्या.
दरम्यान, येत्या 72 तासांत उत्तर कोकणासह मुंबईत मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता, कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे. शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस कोसळेल, असा अंदाज आहे.
मुंबईत पावसाला सुरुवात झाली असली, तरी उर्वरीत महाराष्ट्रातही दमदार पाऊस सुरु आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे.