राणेंचं शक्तीप्रदर्शन पण कट्टर समर्थक कोळंबकर गैरहजर!
एबीपी माझा वेब टीम | 19 Sep 2017 12:41 PM (IST)
‘नारायण राणे माझे जुने मित्र आहेत. पण त्यावेळची परिस्थिती दाखवेल मी नेमका कुठे आहे ते.’
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातील शक्तीप्रदर्शनात त्यांचे खंदे समर्थक आणि काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर हे मात्र गैरहजर होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. कोळंबकर हे राणेंचे खंदे समर्थक असूनही शक्तिप्रदर्शनाला दांडी मारल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे राणे नेमका काय निर्णय घेणार आहेत याबाबतही सर्वाना उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, याविषयी कोळंबकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी एबीपी माझानं त्यांच्याशी संपर्कही साधला. आपण मतदारसंघातील कामामध्ये व्यस्त असल्यानं कालच्या शक्तीप्रदर्शनाला हजेरी लावता आली नसल्याचं सांगितलं. नारायण राणे 21 सप्टेंबरला आपला महत्त्वाचा निर्णय जाहीर करणार आहेत. पण यावेळी देखील आपण उपस्थित राहणार नसल्याचं कोळंबकर यांनी स्पष्ट केलं. 21 सप्टेंबरला मतदारसंघात घटस्थापनेचा कार्यक्रम असल्यानं हजर राहता येणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. जर राणेनी काँग्रेस सोडली तर तुम्ही बरोबर असला का? या प्रश्नावर कोळंबकर म्हणाले की, ‘नारायण राणे माझे जुने मित्र आहेत. पण त्यावेळची परिस्थिती दाखवेल मी नेमका कुठे आहे ते.’ त्यामुळे आता कोळंबकर हे राणेंसोबत बाहेर पडणार की काँग्रेससोबतच राहणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. संबंधित बातम्या : ‘विरोधी पक्षनेते फिक्सिंग करतात’, नितेश राणेंचा विखे-पाटलांवर आरोप …तोपर्यंत दाढी काढणार नाही : निलेश राणे राणेंच्या ऐतिहासिक घोषणेला घटस्थापनेचा मुहूर्त! राणेंचे कुरघोडीचे सर्व आरोप काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी फेटाळले दसऱ्याआधी सीमोल्लंघन करणार : नारायण राणे