मुंबई : काँग्रेसला राम राम ठोकल्यानंतर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नव्या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष असे पक्षाचे नाव ठेवले. त्यानंतर अवघ्या तासाभरातच राणेंना एनडीएमध्ये येण्याचं आमंत्रण दिल्याची सूत्रांनी माहिती दिली.
विशेष म्हणजे नारायण राणे यांनी एनडीएमध्ये येण्याचं आमंत्रणही स्वीकारलं आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
एनडीएमध्ये समाविष्ट होण्याबाबत नारायण राणे यांच्या औपचारिक घोषणेकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. राणे औपचारिक घोषणा कधी करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
शिवाय, आगामी राज्य मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांचा समावेश होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील आगामी हालचाली महत्त्वाच्या असणार आहेत.
राणेंचा नवा पक्ष : महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष
काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर नारायण राणे यांनी नव्या पक्षाची स्थापना केली आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष असं राणेंच्या नव्या पक्षाचं नाव असेल. मुंबईत एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पक्षाची घोषणा केली आहे. लवकरच या पक्षाची नोंदणी करणार असल्याचं राणेंनी सांगितलं.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सिंधुदुर्गमधील जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर राणेंनी काँग्रेसला रामराम ठोकला होता. तसंच राणेंच्या भाजप प्रवेशाच्याही चर्चा सुरु होत्या. अमित शाहांची भेटही राणेंनी दिल्लीत जाऊन घेतली होती.
मात्र नुकत्याच आपल्या मुंबई दौऱ्यात अमित शाहांनी राणेंना नवा पक्ष काढण्यास सांगितल्यांची माहिती आहे. त्यामुळे राणेंनी नवीन पक्ष स्थापन केला आहे.