मुंबई : "भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांची युती अभेद्य आहे. विधानसभा निवडणूक युतीमध्येच लढणार आहे. आता बहुमताचे कोणते रेकॉर्ड मोडतो हे बघायचं आहे," असं वक्तव राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मुंबईत झालेल्या आमदारांच्या भाजप प्रवेशाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. नेत्यांचं इनकमिंग सुरु झाल्यावर भाजप स्वबळावर लढणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये रंगली होती. त्यावर शिवसेना आणि भाजप एकत्रितच विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट विधान मुख्यमंत्र्यांनी केलं.
युतीमध्येच निवडणूक लढवणार : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री म्हणाले की, "निवडणुकाजवळ आल्या आहेत, आता भाजप स्वबळावर निवडणूक अशी चर्चा माध्यमांमध्ये रंगली आहे. पण या निमित्ताने मी सांगू इच्छितो की, भाजप, शिवसेना आणि मित्रपक्ष आमची युती अभेद्य आहे. या युतीमध्येच निवडणूक लढवणार आहोत. लोकसभा निवडणूक एकत्रित लढलो, विधानसभा निवडणूकही एकत्रित लढवणार आहोत. राज्यात पुन्हा युतीचं सरकार येणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेलाही ठावूक आहे. आता बहुमताचे कोणते रेकॉर्ड आपण मोडतो हे बघायचं आहे. कारण आम्हाला मोठं यश मिळणार आहे."
धाक किंवा प्रलोभनं दाखवून पक्षात घेण्याचे दिवस गेले : मुख्यमंत्री
तसंच भाजपने ईडीची भीती दाखवून तसंच आमिष दाखवून आमदारांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला, असा आरोप शरद पवार यांनी केला होता. त्यांच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, "धाक किंवा प्रलोभनं दाखवून पक्षात घेण्याचे भाजपचे दिवस राहिलेले नाहीत. एक काळ होता जेव्हा भाजप लोकांच्या पाठीशी फिरायचा, आता ती परिस्थिती राहिलेली नाही. आज भाजपमध्ये येण्यास अनेक मंडळी इच्छुक आहेत. जे चांगले आहे, समाजाभिमुख आहेत, अशांना आम्ही भाजपमध्ये प्रवेश देतोय. भाजपमध्ये धर्मशाळा नाही, कोणीही उठावं, भाजपमध्ये यावं, ही परिस्थिती नाही. पण जनतेचा पक्ष जरुर आहे. इथे नेते येताना, त्यांचं कार्य, कर्तृत्व आणि स्थान याचा विकार केला जातो."
काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांचा भाजप प्रवेश
दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुराव पिचड, अकोलेचे आमदार वैभव पिचड, राष्ट्रवादीचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक आणि काँग्रेसचे वडाळ्याचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, नवी मुंबई महापालिकेचे माजी महापौर सागर नाईक यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. महात्मा फुले यांच्या वंशज नीता होले यांनी देखील आज भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच माजी आयपीएस अधिकारी साहेबराव पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.
विधानसभा निवडणूक युतीमध्येच लढणार : मुख्यमंत्री
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Jul 2019 12:36 PM (IST)
नेत्यांचं इनकमिंग सुरु झाल्यावर भाजप स्वबळावर लढणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये रंगली होती. त्यावर शिवसेना आणि भाजप एकत्रितच विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट विधान मुख्यमंत्र्यांनी केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -