मुंबई : भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्ष आणि भाजप खासदार पूनम महाजन यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने ठिकठिकाणी पोस्टर लावले आहेत. "अहो चिऊ ताई... महाभारत, रामायण यांचे कथानक राहू द्या, देश की जनता यह जानना चाहती हैं प्रविण ने प्रमोद को क्यों मारा?" असा मजकूर लिहिलेलं पोस्टर मुंबईल रस्त्यारस्त्यावर लावले आहेत.


मुंबईत सोमय्या मैदानावर 3 फेब्रुवारी रोजी आयोजित भाजयुमोच्या सीएम चषक पारितोषिक वितरण सभारंभात, पूनम महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तुलना रामायणातील मंथरा आणि महाभारतातील शकुनी मामासोबत केली होती.



यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पूनम महाजन यांच्यावर टीका करताना पोस्टर लावून, प्रविण महाजन यांनी प्रमोद महाजन यांना का मारलं?, असा प्रश्न विचारला आहे.

पूनम महाजन काय म्हणाल्या होत्या?

"शरद पवार हे रामायणातील मंथरा, तर महाभारतातील शकुनी मामा आहेत. सगळ्यांचं ऐकल्याचं दाखवून शकुनी मामासारखे नाक खुपसून सगळीकडे महाभारत सुरु करणारे शरद पवारही या महाआघाडीत आहेत. स्वत:ला मिळालं नाही, की इकडचं तिकडे, तिकडचं इकडे करणाऱ्या मंथरा आणि शकुनीसारखी पवारांची अवस्था आहे. असे हे सगळे मिळून मोदींच्या विकासरथाला अडवू पाहत आहेत. परंतु महाआघाडीच्या दलदलीत भाजपचं कमळच उमलेल," असं पूनम महाजन म्हणाल्या होत्या.

पवार म्हणजे मंथरा, प्रियांका म्हणजे तैमूर : पूनम महाजन

जितेंद्र आव्हाडांची टीका

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही पूनम महाजन यांच्यावर टीका केली आहे. "पूनमताई आपल्या वडिलांचे आणि पवारसाहेबांचे संबंध किती मैत्रीपूर्ण होते, याचा विसर आपल्याला कसा काय पडला? महाभारतातल्या कुठल्यातरी काल्पनिक पात्राचं उदाहरण आपण पवारसाहेबांच्या नावाने देता. आपल्याला शोभत नाही. सभ्यतेची पातळी आम्ही कुठल्याही क्षणाला ओलांडू शकतो, पण आमच्यावरचे संस्कार. प्रविण महाजनांनी प्रमोद महाजनांना गोळ्या का मारल्या याचे अंतर्गत कांगोळे हे काही जणांना माहित आहेत, त्यापैकी मी एक आहे. फक्त एकच सांगतो, आमच्या बापाला बोलाल तर खबरदार. मर्यादा सोडायला दोन मिनिटंही लागत नाहीत. पण त्या दोघांचेही संबंध होते, त्याची तरी आठवण आपल्याला घ्यायला पाहिजे होती," असं आव्हाड म्हणाले.