Sameer Wankhede in Dadar Chaityabhoomi Mahaparinirvan din : जातीच्या मुद्यावरून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (NCB Sameer Wankhede) अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या (Nawab Malik) रडारवर आहेत. आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त समीर वानखेडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झाले. मात्र भीमशक्ती रिपब्लिकन सेनेनं वानखेडेंच्या उपस्थितीवर आक्षेप नोंदवला. समीर वानखेडेंना चैत्यभूमीवर येण्याचा नैतिक अधिकार नाही अशी भूमिका भीमशक्ती रिपब्लिकन सेनेनं घेतली. यानंतर काही मिनिटांच्या अंतरानं राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकही पाठोपाठ चैत्यभूमीवर पोहोचले. त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी म्हटलं की, “बाबासाहेबांना अभिवादन करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. अभिवादन करणारे एखाद्या धर्माचे, समाजाचे असं म्हणणं चुकीचं आहे. आम्ही दरवर्षी इथे येतो. काही लोकांनी येणं सुरु केलं आहे हे चांगलं आहे,” असं नवाब मलिक म्हणाले. “मी जो संघर्ष सुरु केला त्याचा जय भीम इम्पॅक्ट सुरु झाला आहे,” असं वाटतं असंही ते म्हणाले आहेत. समीर वानखेडे याआधी चैत्यभूमीवर आल्याचं पाहिलं का? या प्रश्नावर बोलताना त्यांना त्याबद्दल माहिती नाही, पण माझ्यासोबत नमाज पठण करायचे हे खरं आहे असा टोलाही त्यांनी लगावला.


ते माझ्यासोबत नमाज पढायला नियमितपणे यायचे- नवाब मलिक


नवाब मलिक म्हणाले की, बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा अधिकार प्रत्येकाचाच आहे. तो कोणत्याही धर्माचा असो वा जातीचा. काही लोकांनी नव्यानं इथे येण्यास सुरुवात केली हे चांगलंच आहे.  मी जो संघर्ष सुरु केलाय त्याचा जयभीम इम्पॅक्ट आता सुरु झाला आहे. समीर वानखेडे याआधी चैत्यभूमीवर आल्याचं पाहिलं का? या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितलं की,  समीर वानखेडे हे कधी चैत्यभूमीवर इतक्या वर्षात अभिवादनाकरता आले का नाही हे मला माहित नाही पण, ते माझ्यासोबत नमाज पढायला नियमितपणे यायचे हे माहिती आहे, असं मलिक म्हणाले.


पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली


 गेल्या काही काळापासून वादात असलेले एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेदेखील चैत्यभूमीवर दाखल झाले होते. यावेळी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. मात्र यावेळी तेथून बाहेर जात असताना त्यांच्या विरोधक आणि समर्थकांमध्ये   वाद पहायला मिळाला. समीर वानखेडे बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करुन बाहेर आले असता काही भीमसैनिकांनी त्यांच्या चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येण्याकरता आक्षेप घेतला. यामुळे काही काळासाठी वाद निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.


भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष दगडू कांबळे यांनी समीर वानखेडेंच्या उपस्थितीवर आक्षेप नोंदवताना म्हटलं की, “समीर वानखेडेंना बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार नाही. जर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायचं असेल तर त्यांच्या विचारधारेवर चाललं पाहिजे. समीर वानखेडेंना आजच चैत्यभूमीवर येण्याची गरज का भासली?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यानंतर काही मिनिटांच्या अंतरानं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकही पाठोपाठ चैत्यभूमीवर पोहोचले. 

अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर


महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. मध्यरात्रीपासून शेकडो आंबेडकरी अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रांगा लावल्या आहेत. गर्दी होऊ नये तसेच कोरोना बाबतचे नियम पाळले जावेत म्हणून इथे मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील कोव्हिडचे संकट असल्याने प्रशासनाने गर्दी न कोव्हिड बाबत सुरक्षेचे उपाय योजना करण्याचे आवाहन केले होते. तरी देखील शेकडो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. 


संबंधित बातम्या


अभिवादनासाठी चैत्यभूमीवर आलेल्या समीर वानखेडेंच्या विरोधक आणि समर्थकांमध्ये वाद, नेमकं काय घडलं?

Mahaparinirvan Din : थँक्स आंबेडकर! चैत्यभूमीवर महामानव डॉ बाबासाहेबांना दिग्गजांकडून अभिवादन


Mahaparinirvan Din LIVE : आज महापरिनिर्वाण दिन, पाहा प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर