जयदत्त क्षीरसागर आणि देवेंद्र फडणवीस यांची ही भेट नवीन नाही. यापूर्वी ज्यावेळी फडणवीस बीडमध्ये आले होते, तेव्हा ते थेट क्षीरसागर यांच्या घरी चहा- पाण्यासाठी गेले होते. तेव्हापासून क्षीरसागर यांची भाजपसोबतची जवळीक दिवसेंदिवस वाढत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर, क्षीरसागर हे पंकजा मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजे ‘रॉयल स्टोन’वर गेले. तिथे त्यांनी पंकजांच्या विघ्नहर्त्याचं दर्शन घेतलं. विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणी भाजपाकडून विधानपरिषदेचे आमदार झालेले सुरेश धस त्यांच्यासोबत होते.
काही दिवसांपूर्वीच बीडची राष्ट्रवादी म्हणजे धनंजय मुंडे बजरंग सोनवणे यासोबतच संदीप क्षीरसागर हे शरद पवारांच्या भेटीला गेले होते. एवढेच नाही तर पवारांना बीड भेटीचं आमंत्रण सुद्धा त्यांनी दिलं होतं. त्यामुळे त्या भेटीनंतर आता क्षीरसागर आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाल्याने क्षीरसागरांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.
बीडमधील राष्ट्रवादीचा वाद
बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचा वाद राज्याला परिचीत आहे. धनंजय मुंडेंसोबतच्या वादामुळे राष्ट्रवादीचे मोठे नेते सुरेश धस हे भाजपमध्ये दाखल झाले. तर जिल्हा परिषद. नगरपालिका निवडणुकांमध्ये जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीपासून लांब होते.
जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्यात वाद आहेत. बीडमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत क्षीरसागर काका-पुतण्याचा वाद टोकाला गेला होता. संदीप क्षीरसागर यांनी त्यांचे काका, आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
संदीप क्षीरसागर यांच्याकडे राष्ट्रवादीची धुरा
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने बीड राष्ट्रवादीची धुरा संदीप क्षीरसागर यांच्याकडे दिली आहे. त्यामुळेही जयदत्त क्षीरसागर सध्या राष्ट्रवादीपासून लांब आहेत.
कोण आहेत जयदत्त क्षीरसागर?
- जयदत्त क्षीरसागर हे बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत
- 2014 च्या निवडणुकीत त्यांनी शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचा पराभव केला होता
- काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात ते सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री होते
- जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे.
संबंधित बातम्या
क्षीरसागर यांच्या घरी मुख्यमंत्री, राष्ट्रवादीला आणखी एक झटका?
बीडमध्ये जयदत्त क्षीरसागरांविरोधात पुतण्या संदीप यांची तक्रार
अजित पवारांच्या दौऱ्याला बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर गटाची दांडी