मुंबई : रस्त्यावरील उघडे अन्नपदार्थ खाऊन आजारी पडणाऱ्यांची संख्या कमी नाही. रस्त्यावरील काही खाद्य विक्रेते निष्काळजी बाळगत असल्याची कल्पनाही आपल्याला असते, मात्र 'दृष्टीआड सृष्टी' म्हणत आपण त्याकडे डोळेझाक करुन हे पदार्थ खातो. परंतु रेल्वे स्थानक किंवा तत्सम ठिकाणी अन्न खरेदी करुन बिनधास्तपणे खाणाऱ्यांना सावध होण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. मुंबईतील बोरीवली स्टेशनवर एक इडली विक्रेता चटणीसाठी चक्क शौचालयातील पाणी वापरत असल्याचं व्हिडिओमध्ये कैद झालं आहे.

कुर्ला स्थानकावरील लिंबू पाण्याच्या गलिच्छपणाचं उदाहरण ताजं असतानाच बोरीवली स्टेशनवरील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे. यामध्ये इडलीसोबत चटणी तयार करण्यासाठी संबंधित विक्रेता रेल्वे स्थानकावरच्या टॉयलेटमधून पाणी घेऊन जाताना दिसत आहे. या पाण्यातून तयार केलेली चटणी ग्राहकांना दिली जात होती. एका सजग ग्राहकाने ही दृश्यं मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली.

आतापर्यंत महापालिका किंवा पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केलेली नसली, तरी रेल्वे पोलिस या इडली स्टॉलवाल्याचा शोध घेत आहेत. बोरीवली स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरील पार्किंगजवळ असलेल्या टॉयलेटजवळची ही घटना असल्याचं बोरीवली जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पाटील यांनी सांगितलं. या प्रकरणाची अद्याप तक्रार नसली, तरी कारवाई करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं.



गलिच्छ लिंबू सरबत

लिंबू सरबत किती गलिच्छ पद्धतीने तयार केलं जातं, हे दाखवणारा एक व्हिडीओ मार्च महिन्यात व्हायरल झाला होता. कुर्ला रेल्वे स्थानकावरील हा स्टॉल रेल्वे प्रशासनाने सील केला होता. उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेक प्रवासी स्टेशनवरील थंडगार लिंबू सरबत पितात. मात्र कुर्ल्यात हार्बर रेल्वे मार्गावरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 7 आणि 8 वर असलेल्या खाद्य पदार्थाच्या स्टॉलवर अतिशय घाणेरड्या पद्धतीने लिंबू सरबत बनवत असल्याचं समोर आलं होतं.

स्टॉलच्या छतावर कामगार लिंबू सरबत बनवत होता. यानंतर त्याने सरबतामध्येच हात धुतले. कुर्ला रेल्वे स्थानकावरील पुलाचे पत्रे काढल्याने एका प्रवाशाच्या ही बाब निदर्शनास आली. त्याने हा प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आणि त्याची रेल्वेकडे तक्रारही केली होती. तसंच सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला होता.

VIDEO | रेल्वे स्थानकांवर लिंबू सरबत पिणाऱ्यांनो सावधान



कुर्ला स्टेशनवरील सरबत तयार करण्याच्या व्हिडीओची घटना ताजी असतानाच वांद्रे स्टेशनवरील एक धक्कादायक प्रकारही समोर आला होता. या व्हिडीओत एक भला मोठा उंदीर खाद्यपदार्थाच्या रॅकमध्ये फिरताना दिसून आला होता.

VIDEO | रेल्वे स्टेशनवरील अन्नपदार्थांच्या खाचेत उंदीर, वांद्रे स्थानकावरील प्रकार | मुंबई | एबीपी माझा


पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यातच ग्राहकांच्या जीवाशी खेळ करणारे प्रकार समोर येत आल्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.