अहमदनगर : अहमदनगर लोकसभेची जागा काँग्रेसला सोडायला राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील या जागेसाठी इच्छुक आहेत. या जागेवरुन अहमदनगरमध्ये आघाडीत बिघाडीची स्थिती निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगर लोकसभा जागेसाठी आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अहमदनगरची जागा सोडण्यास स्थानिक नेत्यांनी विरोध केला. दोन आमदार असताना जागा का सोडायची, असा प्रश्नही स्थानिक नेत्यांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादीच्या बैठकीत आज तीन नावांवर चर्चा झाला. यामध्ये दादा कलमकर, प्रताप ढाकणे , नरेंद्र घुले पाटील यांच्या नावाचा समावेश आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार संग्राम जगताप गैरहजर होते. मात्र बैठकीला संग्राम जगतापांना आमंत्रित केलं नसल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.
सुजय विखे पाटील यांच्यासाठी काँग्रेसने अहमदनगरची जागा मागितली. राष्ट्रवादीने काँग्रेसकडे पुणे आणि उत्तर-मध्य मुंबईची जागा मागितली, त्यावेळी काँग्रेसने राष्ट्रवादीकडून अहमदनगरच्या जागेची मागणी केल्याची माहिती आहे.
भाजपकडून दिलीप गांधी सध्या अहमदनगरच्या खासदारपदी आहेत. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजीव रावळे यांचा दोन लाख 9 हजार 122 मताधिक्यांनी पराभव केला होता. बॉलिवूड अभिनेत्री दीपाली सय्यद यांचाही या निवडणुकीत दारुण पराभव झाला होता.