मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील भाषणानंतर राज्यातील समीकरणांमध्ये बदलाचे अंदाज वर्तवले जात असताना, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंच्या अनेक मुद्द्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अंदाज-आडाख्यांना बळ मिळालं आहे. मोदीमुक्त भारत, हिंदू-मुस्लीम राजकारण आणि गुजराती पाट्या या मुद्द्यांवरुन आव्हाडांनी राज ठाकरेंचं समर्थन केले आहे.

या मुद्द्यांवर राष्ट्रवादीचा राज ठाकरेंना पाठिंबा

महाराष्ट्रात मराठी फलक असले पाहिजेत. मातृभाषेचा सन्मान झाला पाहिजे. राज ठाकरे जे बोलले ते बरोबर आहे, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी गुजराती पाट्यांविरोधातील मुद्द्यालाही समर्थन दिले आहे.

तसेच, “हिंदू-मुस्लिम लढवल्याशिवाय भाजप जिंकू शकत नाही, हे राज ठाकरे बोलले तर बरोबर आहे. देश तुटला तरी चालेल पण सत्ता मिळाली पाहिजे, अशी भाजपची भूमिका.”, असेही आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंच्या ‘मोदीमुक्त भारत’च्या घोषणेचंही समर्थन केले.

एकंदरीत राज ठाकरेंना राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरपणे पाठिंबा दिला आहे.

शरद पवार–राज ठाकरे भेटीची सर्वत्र चर्चा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परवा (17 मार्च) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. पवारांची आपण सदिच्छा भेट घेतल्याचे जरी राज ठाकरे यांनी सांगितले असले, तरी त्या भेटीची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. कारण दुसऱ्याच दिवशी म्हणजे काल शिवतीर्थावर राज यांची नियोजित सभा होती.

राष्ट्रीय स्तरावर मोदीविरोधक पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यात शरद पवारांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. राज्यातील पक्षांचाही भाजपच्या विरोधातील सूर सारखा आहे. या पार्श्वभूमीवर राज यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले होते.

महामुलाखत, त्यानंतर शरद पवारांची भेट, शिवतीर्थावरील भाषणात कुठेही राष्ट्रवादी किंवा भाजप वगळता इतर पक्षांवर राज ठाकरेंनी टाळलेली टीका आणि आता जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं राज ठाकरेंच जाहीर समर्थन, या सर्वच पार्श्वभूमींवर राज्यातील राजकीय समीकरणांना वेगळं वळण मिळू शकतं का, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे आणि अंदाजही बळावला आहे.