नवी मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने खासदार राजन विचारे यांना नवी मुंबईतून जोरदार लीड मिळाल्याने राष्ट्रवादी नगरसेवकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. मात्र राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी 55 नगरसेवकांची बैठक घेत पक्ष न सोडण्याचा इशारा दिला आहे.


ऐरोली विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक असूनही शिवसेनेला 45 हजारांची, तर बेलापूर विधानसभेत गणेश नाईक उमेदवार असूनही 40 हजारांचं लीड शिवसेनेला आहे. नवी मुंबईत शिवसेना भाजपला मोठ्या प्रमाणात मतदान मिळत असल्याने नगरसेवक काळजीत पडले आहेत. येत्या वर्षात विधानसभा आणि महानगरपालिका निवडणूक असल्याने गणेश नाईक यांना राजकारणात टिकून रहायचं असल्यास वेगळा विचार करावा, अशी कुजबूज राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये सुरु होती.



ही चर्चा थांबवण्यासाठी राष्ट्रवादी नेते गणेश नाईक यांनी आपल्या 55 नगरसेवकांची खाजगी बैठक घेत त्यांना तंबी दिली. कोणत्याही परिस्थितीत शरद पवार यांना सोडायचं नसून आपण राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच आमदारकी लढणार असल्याचं सांगत त्यांनी पुढील दिशा स्पष्ट केली.

कोणत्याही परिस्थितीत नवी मुंबईतील दोन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार निवडून आणण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश नगरसेवकांना देत एक प्रकारे वेगळ्या पक्षाचा विचारही करु नका असा इशारा नगरसेवकांना गणेश नाईकांनी दिला आहे.