मुंबई : मुंबईत वाहतुकीसाठी महत्वाचे असणारे 34 पूल पालिका आणि रेल्वे प्रशासनाचे धोकादायक ठरवले आहेत. प्रशासनाकडून हे पूल वाहतूकीसाठी पूर्णत: किंवा अंशत: बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईत वाहतुकीची कोंडी वाढली आहे. यातच पावसाळा तोंडावर असताना हे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने एका पावसाने मुंबईची होणारी कोंडी पाहता पावसात मुंबईकरांना मोठ्या गैरसोईला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.



पावसाळ्यात मुंबईतील एकंदर वाहतुकीचा दरवर्षीचा अनुभव पाहता यंदा पूलबंदीमुळे मुंबईकरांचे अधिकच हाल होणार आहेत. करी रोड, चिंचपोकळी, घाटकोपर, लोअर परळ, सायन, खार, विलेपार्ले अशा अनेक ठिकाणी रहदारीच्या पुलांचा वापर बंद किंवा मर्यादित केल्याने पावसाने जोर धरताच वाहतुकीचा बोजवारा उडण्याची भीती व्यक्त होत आहे.

मुंबई महापालिका अखत्यारीत येणाऱ्या 29 आणि रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या 5 धोकादायक पुलांपैकी 13 पूल बंद करण्यात आले आहेत. तसंच 8 पूल पाडण्यात आले आहेत. उरलेले 8 पूल सध्या वाहतुकीसाठी सुरु असले तरी कधीही ते बंद केले जाऊ शकतात. यामुळे पूलबंदीमुळे आधीच मुंबईची कोंडी वाढली आहे. मात्र पावसाळ्यात मुंबईत ठिकठिकाणी तुंबणारं पाणी आणि त्याचा वाहतुकीवर होणारा परिणाम पाहता येत्या पावसाळ्यात मुंबईकरांचे हाल होणार आहेत.

मुंबईतील पुलांची सद्यस्थिती

डिलाइल रोड पूल वाहतुकीसाठी बंद

लोअर परळ पुलाचं पाडकाम सुरु

करी रोड पुलावरुन अवजड वाहतूक बंद

घाटकोपर पूर्व-पश्चिम जोडणारा पूल बंद

सायन पुलावर अवजड वाहनांना वाहतुकीस मनाई

घाटकोपर-अंधेरी जोडरस्त्यावरील पूल वाहतुकीसाठी बंद

कुर्ला स्थानकातील दोन पूल बंद

दादर स्थानकातील पादचारी पूल बंद

माटुंगा आणि शीव स्थानकांदरम्यान असलेला पादचारी पूल बंद

घाटकोपर स्थानकातील पादचारी पुलाच्या पायऱ्यांची दुरुस्ती सुरु

मरिन लाइन्सचा पादचारी पूल पाडला

चर्नी रोड पूल पादचाऱ्यांसाठी बंद

पश्चिम रेल्वेवरील खार स्थानकास जोडणारा पूल दुरुस्तीसाठी बंद

विलेपार्ले स्थानकातील पादचारी पूलाचे दोन भाग दुरुस्तीसाठी बंद

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकातील पूल पायऱ्या दुरुस्तीसाठी बंद