मुंबई : अकरावी-बारावीची भरमसाठ फी घेणारे अनेक कोचिंग क्लासेस आतापर्यंत आपण पाहिलेत. मात्र, मुंबईतील कलिना विद्यापीठात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी खास वर्ग भरत आहे. 'टीच' या तरुणांच्या ग्रुपने 2016 साली अकरावी-बारावीतील दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सुरुवात केली. दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावं, त्यांना नव्या संधी आणि नवे मार्ग उपलब्ध व्हावेत, यासाठी या तरुणांनी पुढाकार घेतला आहे


यंदा बारावीच्या निकालात 'टीच' टीमच्या पहिल्या बॅचमधील 23 पैकी 22 विद्यार्थ्यांना यश मिळालं आहे. त्यामुळे आता त्यांच्या वर्गात विद्यार्थीसंख्या 64 वर गेली. समाजसेवा करणारे, दिव्यांगांबद्दल आस्था असणारे आणि समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो, ही  भावना असलेले आठ तरुण एकत्र आले. यामध्ये काही जणांनी आपली कॉर्पोरेट नोकरी सोडून दिव्यांगांचं स्वप्न पूर्ण करण्याचा पण केला आणि टीच ग्रुपची स्थापना झाली.

आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी दिली जाते. या विद्यार्थ्यांना अकरावी-बारावी कॉमर्स शाखेचं शिक्षण दिलं जातं. त्याआधी दिव्यांग विद्यार्थ्याला जवळील महाविद्यालयात प्रवेश देऊन त्याची संपूर्ण तयारीही या टीच टीमकडून करुन घेतली जाते. यासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना अगदी एबीसीडीपासून विषय साइन लँग्वेज शिकवले जातात. पुढे आर्ट्स आणि सायन्स शाखेतसुद्धा येथे क्लास सुरु करण्याचा टीमचा मानस असून लवकरच पदवी शिक्षणही दिव्यांग विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे. मात्र लॅबोरेटरी, साधनांची कमतरता असल्यामुळे तरुणांना यामध्ये अडचणी येत आहेत.

जास्तीत जास्त सुशिक्षित तरुणांनी पुढाकार घ्यावा आणि दिव्यांगांचं उच्चशिक्षणाचं स्वप्न पूर्ण करण्यास हातभार लावावा, असं आवाहन टीच टीम कडून करण्यात आलं आहे.