नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक 9 सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वाशीत होणाऱ्या जाहीर कार्यक्रमात नाईक भाजपवासी होणार असल्याची माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईत आज बऱ्याच राजकीय घडामोडी घडणार आहेत. राष्ट्रवादीचे 50 आणि पाच अपक्ष नगरसेवक मिळून आज वेगळा गट स्थापन करणार आहेत. हे नगरसेवक कोकण आयुक्तांकडे जाऊन राष्ट्रवादीतून बाहेर पडत वेगळा गट स्थापन करणार आहेत. यामुळे नवी मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार आहे. पक्षांतर करून संपूर्ण महापालिका भाजपमय होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना असेल.




याआधीच संदीप नाईक यांनी कमळ हाती घेत भाजपचा रस्ता धरला. संदीप नाईक यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीच्या 22 आणि अपक्ष 4 नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा दिला असल्याने संदीप नाईक यांचे पारडे जड झाले होते. आता राष्ट्रवादीच्या जवळपास सर्वच नगरसेवकांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीची अस्तित्वाची लढाई सुरू आहे.

आमदार संदीप नाईक यांनी 31 जुलै रोजी भाजप प्रवेश केला होता. यावेळी राष्ट्रवादीचे मधुराव पिचड, वैभव पिचड, शिवेंद्रराजे भोसले,  चित्रा वाघ आणि काँग्रेसचे वडाळ्याचे आमदार कालिदास कोळंबकर यांचा देखील प्रवेश झाला होता. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.