मुंबई : राष्ट्रावादीचे नेते आणि माजी मंत्री सचिन आहिर यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादी पक्ष सोडताना फार आनंद होत नाही, मात्र काही वेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात, अशी प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी दिली आहे.


बाळासाहेब ठाकरे याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेनेत आलो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न करणार नाही, शिवसेना पक्ष वाढवण्याचा काम करणार आहे, असं सचिन अहिर म्हणाले.


राष्ट्रवादी सोडताना फार आनंद होतोय असं नाही. गेली अनेक वर्ष एका विचाराने आणि एका प्रवाहात काम करत आलो आहे. शरद पवार यांच्यासोबत कधी न सुटणारी साथ आहे. राजकारणात काही वेळा काही निर्णय घ्यावे लागतात. मात्र ते निर्णय योग्य की अयोग्य हे काळच ठरवेल, अशी प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी दिली.



आदित्य ठाकरे यांच्या कामाने आणि व्हिजनने प्रभावित झालो आहे. आदित्य यांच्याकडे जनहिताची कामं करण्याची जिद्द आहे. त्यामुळे शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यानंतर निर्णय घेतल्याचं सचिन अहिर यांनी सांगितलं.


शरद पवार यांना गेल्या आठवड्यात भेटण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना या सगळ्या गोष्टी सांगण्याचं धाडस झालं नाही. वरळी विधानसभा क्षेत्रातील राजकीय परिस्थिती त्यांच्या समोर मांडण्याचाही प्रयत्न केला असल्याचं सचिन अहिर यांनी म्हटलं.


सचिन अहिर याचा प्रवेश शिवसेनेसाठी महत्त्वाचा आहे. अनेक दिवसांपासून आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो. त्यानंतर सचिन अहिर आणि उद्धव ठाकरे यांची भेट करुन दिली. मग त्यांनी शिवसेना प्रवेशाचा निर्णय घेतला, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.


आदित्य ठाकरेंचा मार्ग मोकळा?


आदित्य ठाकरे भविष्यात वरळी विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढले तर या भागात विरोधी पक्ष संपवून शिवसेनेची मोठी ताकद उभी करता येईल. सचिन अहिर यांची वरळीच्या प्रेम नगर, सिध्दार्थ नगर, जिजामाता नगर, गांधी नगर आणि बीडीडी चाळींमध्ये मोठी ताकद आहे. भविष्यात आदित्य ठाकरे वरळीतून उभे राहिले तर सचिन अहिरांच्या जवळ असलेली मतं शिवसेनेला मिळतील. विरोधी पक्षांची ताकद नसल्यानं आदित्य ठाकरे मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील, असा विश्वास शिवसेनेला आहे.


सचिन अहिरांना कोणती विधानसभा?


वरळी विधानसभेत याआधी सचिन अहिर यांनी काम केलं आहे. त्यानंतर शिवसेनेच्या सुनिल शिंदेंनी सचिन अहिर यांचा पराभव करत याठिकाणी विजय मिळवला. सुनिल शिंदे यांनी वरळी विधानसभेत कमी कालावधीत आपला ठसा उमटवला. त्यामुळे वरळी विधानसभा सचिन अहिर यांच्या हाताला लागण्याची शक्यता कमी आहे. तर दुसरीकडे भायखळा विधानसभेसाठी सचिन अहिर इच्छुक असल्याची चर्चा आहे. सध्या भायखळ्यात एमआयएमचे वारिस पठाण आमदार आहे.



संबंधित बातम्या