मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात बसणार असं पक्षाचे नेते सांगत असताना अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या तरी आम्ही विरोधी पक्षात बसणार आहोत. मात्र राजकारणात कोणीच कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, असं अजित पवारांनी म्हटलं.
अजित पवारांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अजित पवार यांना नेमकं काय म्हणाचंय याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. राज्यात जे सरकार येईल ते स्थिर पाच वर्षांसाठी असावं. विरोधी पक्षानेही पाच वर्ष नीट काम करावं, अशी आशा अजित पवारांनी व्यक्त केली.
विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री बारातमतीत येऊन म्हणाले होते की गोपीचंद पडळकर आमचा ढाण्या वाघ आहे. मात्र आता त्या ढाण्या वाघाचं मांजर झालंय का बघावं, असा टोला अजित पवारांनी लगावला. अजित पवारांनी भाजपच्या गोपीचंद पडळकरांचा जवळपास 1 लाख 60 हजार मतांनी पराभव केला. बारामतीत गोपीचंद पडळकरांसह इतर सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं.
राज्यात आणि देशात कितीही लाटा असल्या तरीही बारामतीकरांनी कधीही आमची साथ सोडली नाही. मी दबक्या आवाजात म्हटलं होतं की निवडणुकीत एक लाखांच्या मताधिक्क्याने निवडून येईन. मात्र बारातमीकरांनी त्यापुढे जात मला त्याहून अधिक मतांनी निवडून दिलं. यासाठी अजित पवारांनी बारामतीकरांचे आभार मानले.