मुंबई : भारतीय जनता पक्षाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधीमंडळ पक्षनेता आज ठरणार आहे. दोन्ही पक्षांच्या आज महत्त्वपूर्ण बैठका होणार आहेत. या बैठकांमध्ये भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार तर राष्ट्रवादीच्या विरोधी पक्षनेत्याची निवड होईल.

भाजपने बोलावलेल्या बैठकीला भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले 105 नवनिर्वाचित आमदार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भुपेंद्र यादव, नरेंद्रसिंह तोमर आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश खन्ना उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत नव्याने निवडून आलेले आमदार त्यांचा विधीमंडळ पक्षनेता निवडणार आहेत.

साधारण एक वाजता विधिमंडळामध्ये भाजपच्या आमदारांचे स्नेहभोजन आहे. दुपारी 2 नंतर सर्व भाजप आमदार फेटे घालून विधिमंडळाच्या पायऱ्यांच्या ठिकाणी जमतील. मग मुख्यमंत्री आल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. 2.30 नंतर विधीमंडळ इमारतीच्या 10 मजल्यावरील सभागृहात विधीमंडळ नेता निवडीचा कार्यक्रम सुरू होणार आहे.

भाजपची ही बैठक केवळ औपचारिकता म्हणून घेतली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच विधीमंडळ नेतेपदी पुन्हा एकदा नियुक्ती केली जाणार आहे. आजची ही बैठक भाजपचं सत्तास्थापनेच्या बाजूने उचलेलं पहिलं पाऊल असणार आहे.

दरम्यान, संध्याकाळी 5 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेत्याची निवड होणार आहे. या बैठकीपूर्वी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत विधीमंडळ नेत्याची निवड करण्याचे सर्व अधिकार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवले जाणार आहेत. त्यानंतर शरद पवार विधीमंडळ नेत्याच्या नावाची घोषणा करतील.

विरोधी पक्षनेता पदासाठी राष्ट्रवादीमध्ये धनंजय मुंडे आणि जितेंद्र आव्हाड यांचं नाव चर्चेत आहे. तर विधीमंडळ नेतेपदासाठी अजित पवार आणि दिलीप वळसे-पाटील यांची नावं आघाडीवर आहेत.

विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता, 'या' नेत्यांची नावं चर्चेत