मुंबई : सहकार मंत्री सुभाष देशमुखांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. लोकमंगल समूहाची रोकड पकडल्याने राजकारण तापलं आहे. सहकारमंत्र्यांविरोधात विरोधाक आक्रमक झाले आहेत.


 

उमरग्यामध्ये काल सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल समूहाची 91 लाख 50 हजारांची रोकड उस्मानाबादच्या नगरपालिका भरारी पथकानं जप्त केली. ज्यामध्ये एक हजाराच्या जुन्या नोटा होत्या. मात्र ही ऊसतोडणी कामगाराच्या टोळीला देण्यासाठी होती, असा दावा सुभाष देशमुख यांनी केला आहे.

“राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे एक कोटी रुपये पकडण्यात आले आहेत.  देशात काळ्या पैश्यांच्या विरोधात मोहीम चालू असताना भाजपच्या मंत्र्यांकडे एक कोटी मिळणे म्हणजे काळा पैसा भाजपकडेच आहे. आमची मागणी आहे की या मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करून यांच्यावर गुन्हा दाखल करून तुरूंगात टाकले पाहिजे.”, असे नवाब मलिक म्हणाले.

निवडणूक आयोगाची नोटीस

निवडणूक आयोगाची लोकमंगल समूहाला नोटीस धाडली आहे. 24 तासांच्या आत पकडलेल्या 91 लाख 50 हजार रूपयांचा खुलासा करण्याचे सांगितले आहे. लिखित स्वरुपात अद्याप लोकमंगलकडून खुलासा करण्यात आलेला नाही.