मुंबई : राज्य सरकारला आता जवळपास तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या सरकारवर जनतेला विश्वास राहिलेला नाही, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केली. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने पत्रकार परिषद घेऊन सरकारवर निशाणा साधला.


राज्य सरकारचा सगळा कारभार गोल गोल आहे, त्यात मोठा झोल झोल आहे. त्यामुळे सरकारवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही, असे टीका धनंजय मुंडे यांनी केली.

धनंजय मुंडे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील हेही उपस्थित होते. विशेष म्हणजे यावेळी विरोधकांमध्येच फूट पाहायला मिळाली. कारण  अधिवेशनापूर्वी विरोधक एकत्र येत माध्यमांशी संवाद साधतात. मात्र, यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतंत्र पत्रकार परिषदा घेतल्या.

शेतकरी कर्जमाफी, कुपोषण, बालमृत्यू, शिक्षण यांच्यासह अनेक मुद्द्यांवर अधिवेशनात आवाज उठवण्याचं आश्वासन राष्ट्रवादीने यावेळी दिलं. शिवाय, हमीभाव, कर्जमाफी, नेवाळी प्रकरण यावरुनही सरकारला जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्जमाफीवरुन सरकारवर निशाणा

“कर्जमाफीची घोषणा फसवी आहे, हे आता शेतकऱ्यांनाही कळलं आहे. अद्याप कोणत्याही शेतकऱ्याला कर्जमाफीचा फायदा मिळाला नाही. शिवाय, कर्जमाफी कशी देणार, त्यासाठी निधी कसा उभा करणार, याची काहीही तयारी राज्य सरकारची नाही.”, अशी टीका धनंजय मुंडे यांनी सरकारवर केली.

तूरडाळ व्यापऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावाने घोटाळा केला, असं स्वत: मुख्यमंत्र्यांनी सांगितले. चौकशीही लावली. मग, त्या चौकशीचं पुढे काय झालं?, असा सवाल धनंजय मुंडे यांनी विचारला.

डाळ खरेदीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांची समिती नेमण्याची मागणी करणार असल्याचेही मुंडेंनी यावेळी सांगितले.

मराठवाडा, विदर्भात जुलै अर्धा सरला तरी पाऊस नाही, सगळीकडे दुबार पेरणीची परिस्थिती आहे. त्यामुळे जिथे दुबार पेरणीची वेळ आली आहे, त्यांना अनुदान द्यावं, अशी मागणीही असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले.