मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन सध्या राज्याचं राजकारण तापलं आहे. त्यामुळे विरोधकांनी सरकारला घेरण्यासाठी आणि सरकारने आंदोलन हाताळण्यासाठी कंबर कसली आहे. त्यात आज सर्वच राजकीय पक्षांच्या बैठकांवर बैठका होत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याही स्वतंत्र बैठका आज पार पडल्या.

काँग्रेसच्या बैठकीत काय झालं?

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासंदर्भात काँग्रेसची विधिमंडळात बैठक पार पडली. या बैठकीत काय झालं, यासंबंधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी माहिती दिली.

“मराठा अरक्षणावरुन राज्यात स्थिती स्फोटक होत चालली आहे. सेल्फी काढून तरुण आत्महत्या करु लागलेत. परिस्थिती सरकारच्या हाताबाहेर चालली आहे.”, असे अशोक चव्हाण म्हणाले.


तसेच, “आम्ही आजच्या बैठकीत राज्यात सुरु असलेल्या आंदोलनाच्या परिस्थितीचा, आत्महत्येचं सत्र यांचा आढावा घेतला. आज संध्याकाळी याबाबत आम्ही राज्यपालांची भेट घेत आहोत. त्यानंतर 5 वाजता मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेणार आहोत.” अशी माहिती चव्हाणांनी दिली.

शिवाय, “मराठा आरक्षणासोबतच मुस्लिम आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सरकारने आता वेळकाढूपणा करु नये.”, असे चव्हाण म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत काय झालं?


राष्ट्रवादी काँग्रेसचीही मराठा आरक्षणासंदर्भात मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी माहिती दिली.

नवाब मलिका काय म्हणाले?

“मराठा, धनगर, मुस्लिम समाज आरक्षणाबाबत चर्चा झाली. आम्ही मागासवर्ग आयोगाला भेटू, त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता राज्यपालांची भेट घेऊ. दोन्हीकडे निवेदन देणार आहोत.”, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

तसेच, “राज्यात मराठा समाज आंदोलन सुरु आहे. पाच मराठा समाजातील पाच जणांनी जीव गमावला आहे. बंद अद्यापही सुरु आहे. सरकार आश्वासन देते, वेळकाढूपणामुळे ही स्थिती आहे. अधिवेशनात प्रस्ताव मंजूर करुन केंद्राला शिफारस केली पाहिजे. घटनादुरुस्ती झाली पाहिजे, ही पक्षाची भूमिका आहे.”, असेही मलिक यांनी सांगितले.