मुंबई : जुहू आणि गिरगाव समुद्रकिनाऱ्यांवर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या संख्येत विषारी ’ब्लू बॉटल’ जेलीफिश आढळत आहेत. सागरी परिसंस्थेच्या अभ्यासकांच्या निदर्शनास हे जेलीफिश आले. हे जेलीफिश दंश करत असल्याने नागरिकांनी सतर्क राहून, उत्साहाच्या भरात समुद्रात उतरु नये, असे आवाहन अभ्यासकांनी केले आहे.

समुद्राच्या लाटांसोबत हे जेलीफिश हेलकावे घेतात. छत्रीच्या आकाराचे असणारे हे जेलीफिश दिसायला आकर्षक असतात, मात्र यातल्या काही प्रजाती विषारी आहेत. मुंबईच्या समुद्रात साधारणत: तीन प्रकारचे जेलीफिश आढळतात. पावसाळ्याआधी ‘ब्लू बटन’ नावाचे जेलीफिश समुद्रकिनारी येतात, तर पावसाळ्यात ‘ब्ल बॉटल’ आणि पावसाळ्यानंतर ‘बॉक्स’ जेलीफिश किनाऱ्यावर येतात. यातील ब्लू बॉटल जेलीफिश विषारी असतात.



‘मरीन लाईफ ऑफ मुंबई’ या मोहिमेतील अभ्यासकांना गिरगाव आणि जुहू किनाऱ्यावर हे विषारी जेलीफिश आढळले. ‘मरीन लाईफ ऑफ मुंबई’ या मोहिमेअंतर्गत काही अभ्यासक मुंबईच्या सागरी परिसंस्थेचा अभ्यास करतात.

गेल्या काही वर्षांमध्ये गणपती विसर्जनादरम्यान जेलीफिशच्या दंशामुळे भाविक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

‘ब्लू बॉटल’ जेलीफिशचे शरीर दोन इंच आकाराचे निळ्या रंगाचे फुग्यासारखे असते, तसेच सात इंच दोरीसारखे पाय असतात. ‘ब्लू बॉटल’ जेलीफिशने डंख केल्यास त्या ठिकाणी लाल रंगाचे व्रण उठून गाठ येते आणि असह्य वेदनाही होतात.

जेलीफिशच्या दोरीसारख्या पायांमध्ये विष असल्याने नागरिकांनी सुमद्रकिनाऱ्यावरुन अनवाणी फिरु नये, असे आवाहन अभ्यासकांकडून करण्यात आले आहे.