मुंबई : मुंबईची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबईत नवे उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. यापैकीच एक पूर्व द्रुतगती मार्गावरून बीकेसीला जाणाऱ्या नवा उड्डाणपुलाचे कामही अंतिम टप्प्यात आहे. परंतु हा उड्डाणपूल फक्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठीच खुला केला जात नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार नवाब मलिक यांनी या मार्गावर आंदोलन केले. या वेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. यावेळी मुंबईतून शेकडो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. या पुलाच्या सुरुवातीला तयार करण्यात आलेली भिंत जेसीबीने तोडून टाकून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न मलिक यांनी जेसीबी वर चढून केला.


यावेळी नवाब मलिक यांची समजूत काढण्यासाठी पोलीस अधिकारी आणि एमएमआरडीएचे अधिकारी देखील दुसऱ्या जेसीबी वर चढले आणि त्यांची समजूत काढली. अखेर आठ दिवसात हा पूल काहीही करून सुरू करणार असे आश्वासन मिळाल्यानंतर राष्ट्रवादीने हे आंदोलन मागे घेतले. एव्हरार्ड नगर येथे सकाळी नवाब मलिक यांनी आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी इथे आणण्यात आलेल्या जेसीबी मशीनवर नवाब मलिक आणि त्यांचे कार्यकर्ते उभे होते, त्याच मशीनवर येवून एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी एमएमआरडीएच्या आयुक्तांना फोनवरून बोलून हे आश्वासन दिले.

आज लोकार्पण करणारच या ठाम भूमिकेवर आमदार नवाब मलिक होते. त्यामुळे पुलाचे उद्घाटन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते चुनाभट्टी येथील एव्हरार्ड नगर आणि या परिसरात जमा झाले होते. मात्र त्यापूर्वीच प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चुनाभट्टी येथील या पूलाच्या जवळ येण्यापूर्वीच त्यांना प्रियदर्शनीच्या पुलाजवळ अडवण्यात आले.  त्याच ठिकाणी मलिक यांना हे आंदोलन मागे घ्यावे, आम्ही येत्या आठ दिवसात हा पूल सुरू करू असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आमदार नवाब मलिक यांनी आपण हे आंदोलन मागे घेत असल्याचे यावेळी जाहीर केले.

चुनाभट्टी येथील एव्हरार्ड नगर ते एमएमआरडीए या पट्ट्याला जोडणारा हा पूल आघाडी सरकारच्या काळात मंजूर करण्यात आला होता. त्यावेळी त्याची काही कामे सुरू झाली होती परंतु मागील पाच वर्षात या पुलाचे काम अत्यंत संथ गतीने झाले. विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस अगोदर या पुलाचे पूर्ण काम झाले होते, मात्र त्याचे उद्घाटन झाले नसल्याने आमदार नवाब मलिक यांनी या पुलामुळे स्थानिकांना प्रचंड वाहतुकीचा त्रास होत असल्याने आपण याचे उद्घाटन करणार असल्याचा इशारा दिला होता.