मुंबई : "करण जोहरचं नाव घे, तरच वाचशील", अशी स्पष्ट धमकी एनसीबीचे वरीष्ठ अधिकारी समीर वानखेडे यांनी दिल्याचं आरोपी क्षितिज प्रसादच्यावतीनं कोर्टाला देण्यात आली आहे. रविवारी क्षितिज प्रसादचे वकील सतीश मानेशिंदे यांनी मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टातील रिमांडवरील सुनावणी दरम्यान कोर्टाला ही माहिती दिली. इतकचं नव्हे तर वानखेडे यांनी कश्या पद्धतीनं दिग्दर्शक क्षितिज प्रसादचा चौकशी दरम्यान बराच छळ केला याचीही कोर्टाला माहिती दिली.


सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी करताना एनसीबीनं अटक झालेल्या आरोपींवर थर्ड डीग्रीचा वापर केल्याचं याआधीही काही वकिलांनी कबूल केलं आहे. मात्र सतीश मानेशिंदे यांनी कोर्टात त्याचा पाढाच वाचून दाखवला. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनला कसंही करुन याप्रकरणात खेचायचा चंगच एनसीबीनं बांधलाय, असा थेट आरोप क्षितिजचे वकील सतीश मानेशिंदे केला आहे.


क्षितिज प्रसादला चौकशीला बोलावण्यापासून एनसीबीनं त्याला अटक करेपर्यंत कशापद्धतीनं त्रास दिला, त्याला कशा पद्धतीची वागणूक मिळाली ते ऐकून बॉलिवूडचे धाबे दणाणून जातील. चौकशी दरम्यान एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी क्षितिजला आपल्या खुर्चीसमोर खाली बसायला भाग पाडलं, इतकचं नव्हे तर त्याच्या चेहऱ्याजवळ बुटाचा पाय लावत "हीच तुमची खरी औकात आहे". असं सुनावल्याचा गंभीर आरोप क्षितिजनं लावलाय.


बॉलिवूडचा किंग खान शाहरुख अन् करण जोहर NCB च्या रडारवर?


क्षितिज या संपूर्ण प्रकारानं पूर्णपणे हादरून गेला आहे. एनसीबीचे अधिकारी त्याला वारंवार करण जौहर आणि धर्मा प्रॉडक्शनच्या वरीष्ठ सदस्यांचं नाव घेण्यास भाग पाडत होते. मात्र आपण कुणालाही व्यक्तिगतरित्या ओळखत नाही, त्यामुळे ते ड्रग्ज घेतात का?, किंवा त्यांच्या कुठल्या ड्रग्ज पार्टीशी संबंध आहे का?, याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं त्यानं एनसीबीला सांगितलंय. तूर्तास तपासाची प्रगती पाहता कोर्टानं क्षितिज प्रसादला 3 ऑक्टोबरपर्यंतची एनसीबी कस्टडी सुनावली आहे.


सुशांत स्वत:च्या नशेची सवय पूर्ण करण्यासाठी सर्वांचा वापर करायचा, तसा त्यानं आमचाही केला : रिया चक्रवर्ती


दरम्यान क्षितिजचा धर्मा प्रॉडक्शनशी काहीही संबंध नसल्याचं करण जोहरनं स्पष्ट केलं आहे. 2019 मध्ये त्याच्याशी एक प्रोजक्ट संदर्भात संपर्क झाला होता. मात्र ते प्रोजेक्ट कधी सुरूच झालं नाही, असं धर्मा पॉडक्शननं जाहीर केलं आहे.