मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातली मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्या जामीन अर्जावर याच प्रकरणातील इतर आरोपींसह 29 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. गुरूवारी न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यापुढे या अर्जांवर प्राथमिक सुनावणी पार पडली. त्यावेळी एनसीबीनं अजून या जामीन अर्जांची प्रत आम्हाला मिळालेली नसल्याचं म्हटलं. त्यामुळे यावर उत्तर देण्यासाठी एनसीबीनं कोर्टाकडे वेळ मागून घेतला. मुंबई सत्र न्यायालयानं रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, सुशांतचा नोकर दिपेश सावंत आणि ड्रग्स पेडलर झैद विलात्रा आणि बासित परिहार यांना 6 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.


दरम्यान रिया चक्रवर्तीनं जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत सुशांतवर गंभीर आरोप केले आहेत. सुशांतनं माझा आणि माझ्या भावाचा केवळ स्वत:च्या फायद्यासाठी वापर करून घेतला, जसा तो त्याची नशेची सवय पूर्ण करण्यासाठी इतरांचा करायचा. असा थेट आरोप रियानं केला आहे. तसेच एनसीबीनं ड्रग्सच्या व्यवसाय केल्याबद्दल लावलेलं कलम 27(a) लावल्यालाही आव्हान दिलं आहे. याप्रकरणात दिपेश सावंत, सॅम्युअल मिरांडाच्या जामीन याचिकेसह रिया आणि शौविकच्या याचिकेवरही 29 सप्टेंबर रोजी न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यापुढे सुनावणी होणार आहे.


रियाने चौकशीदरम्यान कुणाचीही नावे घेतली नाहीत, वकील सतीश मानशिंदे यांचा दावा


एनडीपीएस कलमाखाली या सर्वांवर विविध आरोप लावण्यात आले आहेत. रिया चक्रवर्तीची रिमांड जरी एनसीबीनं मागितली नसली तरी, 'आमचा तपास अजून संपलेला नाही' असं एनसीबीच्यावतीनं कोर्टात सांगण्यात आलं. तसेच रिया आणि तिचा भाऊ शौविक यांच्यावर ड्रग्सचा व्यवसाय केल्याचा गंभीर आरोप लावण्यात आला आहे. तसेच इतरांचा या संपूर्ण प्रकरणात सक्रिय सहभाग आहे. त्यामुळे या कलमांअंतर्गत कोर्टानं त्यांना जामीन देऊ नये असा दावा एनसीबीच्यावतीनं मुंबई सत्र न्यायालयत केला होता. त्यावरून 11 सप्टेंबर रोजी या सर्वांचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळून लावला आहे.


आपण निर्दोष असून आपण कोणत्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही. यात आपल्याला गुंतवण्यात आले असून तपासयंत्रणेकडून गुन्हा कबूल करण्यास भाग पाडण्यात आल्याचंही या याचिकेतून नमूद करण्यात आलं होतं. रियाने ड्रग्सचे सेवन केले असले तरीही तिने ड्रग्स रॅकेटला आर्थिक मदत केल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. ड्रग्स सेवन हा जामीन पात्र गुन्हा आहे. असा दावा या याचिकेतून करण्यात आला होता. त्याचबरोबर मागील काही दिवसांपासून रियाला लैंगिक अत्याचाराच्या तसेच जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे तिला जर कोठडी मिळाली तर तिच्या जीवाला धोका संभवू शकतो असं या याचिकेतून म्हटले आहे. त्यामुळे तिचे मानसिक संतुलन, सुरक्षितता आणि कोरोनाची पार्श्वभूमी पाहता रियाला जामीन मिळावा, अशी मागणी कोर्टाकडे करण्यात आली आहे.


Drug Case | दीपिकाची उद्या एनसीबीकडून चौकशी, संभाव्य प्रश्नांची यादी एबीपी माझाच्या हाती