ठाणे : भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन आज ठाण्यातून अरुण फरेरा आणि अंधेरी एमआयडीसीतून वर्नोन गोंजाल्विस यांना पुणे पोलिसांनी अटक केली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली.
सुधा भारद्वाज, वर्नोन गोंजाल्विस, अरुण फरेरा यांचा जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर या तिघांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात होती. पुणे पोलिसांनी मुंबईत कारवाई करत वर्नोन गोन्साल्वीस आणि अरुण फरेरा यांना अटक केली आहे.
छापा आणि अटकसत्र
या तिघांची नजरकैद आजच संपली आहे. मात्र, अटक टाळण्यासाठी त्यांनी सात दिवसांची नजरकैद वाढवण्याबाबत पुणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
काय आहे प्रकरण?
पुण्यात 31 डिसेंबर रोजी झालेल्या एल्गार परिषदेचा कोरेगाव-भीमा प्रकरणाशी संबंध जोडत महाराष्ट्र पोलिसांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. 28 ऑगस्ट रोजी या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आणि नजरकैदेत ठेवण्यात आले.
एल्गार परिषद : नक्षली कनेक्शनप्रकरणी पाच जणांना अटक
मजदूर संघाच्या नेत्या सुधा भारद्वाज, तेलुगू कवी वरवर राव, मानवाधिकार कार्यकर्ते अरुण फरेरा, वर्नोन गोंजाल्विस, गौतम नवलखा यांच्यावर नजरकैदेत होती. त्यापैकी गौतम नवलखा यांच्या सुटकेचे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिले, तर अरुण फरेरा, वर्नोन गोंजाल्विस यांना अटक झाली.