Nawab Malik : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकऱणात एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. एनसीबीनं 11 जणांना अटक केली होती. यातील तिघांना सोडून देण्यात आलं. यातील रिषभ सचदेवा भाजप युवामोर्चाचे नेते मोहित कम्बोज यांचे मेहुणे आहेत. यासोबत अमीर फर्निचरवाला, प्रतीक गाभा यांनाही सोडण्यात आलं आहे. क्रुझवरील पार्टीतून या लोकांना अटक करण्यात आलं होतं. एनसीबी कार्यालयात देखील या तिघांना आणण्यात आलं होतं. मग त्यांना सोडण्याचे आदेश कुणी दिले. आमची मागणी आहे की, NCBचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी खुलासा करावा करावा. क्रुझवरील छापेमारीचं हे प्रकरण प्लॅन करुन केलेलं असून बोगस आहे, असा आरोपही त्यांनी केला.
नवाब मलिक म्हणाले की, मुंबई पोलिसांना मागणी आहे की, या लोकांचे कॉल रेकॉर्ड तपासावे. समीर वानखेडे यांची भाजप नेत्यांसोबत बातचीत झाली आहे, हे सर्व कॉल रेकॉर्डमधून समोर येईल. यावर एनसीबीनं खुलासा करावा, असंही ते म्हणाले. जर 1300 लोकं त्या क्रुझवर होते तर केवळ सिलेक्टेड आठ लोकांनाच का पकडलं, असा सवालही मलिक यांनी केला. ही सर्व कहाणी जाणूनबुझुन रचलेली आहे, असंही ते म्हणाले. ही संपूर्ण कारवाई एक षडयंत्र आहे. या सर्व प्रकारात भाजपचे लोक सहभागी होते, म्हणून भाजपच्या संबंधित लोकांना सोडून देण्यात आलं, असं ते म्हणाले.
नवाब मलिक म्हणाले की, रिषभ सचदेवा, प्रतीक गाभा, अमीर फर्निचरवाला या लोकांना सोडण्यात आले आहे. तीन लोकांना यांनी पकडलं होतं त्यानंतर याच तिघांना त्यांनी सोडलं आहे. रिषभ सचदेवा हा भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष राहिलेले मोहित कंभोज म्हणजेच मोहित भारतीय यांचा मेहुणा आहे. आमचा एनसीबीला प्रश्न आहे की तुम्ही 1300 लोकांच्या जहाजावर छापेमारी केली यामधील केवळ 11 लोकचं कशी काय सापडली. आणि यातील 3 लोकांना सोडण्यासाठी तुम्हाला कोणी सांगितलं? आमचा आरोप आहे दिल्लीपासून महाराष्ट्रातील वरिष्ठ भाजपच्या नेत्यांनी त्यांना सोडण्यासाठी फोन केले आणि त्यामुळे एनसीबीने त्यांना सोडलं आहे, असंही ते म्हणाले. ही छापेमारी पूर्णपणे बोगस आहे. प्लॅनिंग करूनच या सर्वांना बोलावण्यात आले आणि प्लॅन करून त्यांना अटक करण्यात आली. आमची मुंबई पोलिसांकडे मागणी आहे की त्यांनी समीर वानखेडे आणि त्या संबंधित सर्वांचे फोन कॉल्स डिटेल्स घ्या, असंही ते म्हणाले.
नवाब मलिक म्हणाले की, गोसावी हा दोन ठिकाणी पंच बनला आहे. यामध्ये त्याने दोन्ही ठिकाणी आपले राहण्याचे पत्ते वेगवेगळे दिले आहेत. प्रवीण दरेकर म्हणतात नवाब मलिक यांनी त्यांच्याकडे जी माहिती आहे ती एनसीबीला द्यावी. माझा त्यांना सवाल आहे की, जे बोगस छापेमारी करतात त्यांनाच कसे काय पुरावे नेऊन देऊ. याबाबत एक कमिशन बसवण्यात यावं आणि त्याची चौकशी व्हायला हवी. प्रतीक गाभा, फर्निचरवाला यांनीचं आर्यन याला क्रूझवर आणलं होतं आणि या प्रकरणात त्यांनाच सोडण्यात आले आहे. त्यांचं पुढील टार्गेट शाहरुख खान आहे, असंही ते म्हणाले.
काल नवाब मलिक यांनी एनसीबीच्या अधिकाऱ्यावर आरोप केले होते. अधिकारी कस्टम मधून एनसीबीला कसा येऊन बसला, त्यासाठी कुठल्या मंत्र्याच्या घरी लॉबिंग करण्यात आली, कुणाच्या बोलण्यावरून हा अधिकारी लोकांना भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे काढण्याचं काम करतो हे मी वेळ आली की लवकरच बाहेर काढणार आहे असं म्हटलं होतं. माझा स्पष्ट आरोप आहे हा अधिकारी केवळ प्रसिध्दीसाठी छापे टाकण्याचं काम करतो आहे. त्यामुळे आता देशात कायद्याचं राज्य आहे की नाही असा सवाल उपस्थित राहू लागला आहे, असं मलिक म्हणाले होते.
Sameer Wankhende: ड्रग माफियांचा कर्दनकाळ असलेला अधिकारी, कोण आहेत समीर वानखेडे?