मुंबई : नवाब मलिकांविरोधातील (Nawab Malik) प्रकरणाचा तपास चार आठवड्यांत पूर्ण करू अशी हमी मुंबई पोलिसांनी हायकोर्टात दिली आहे. अॅट्रॉसिटी गुन्ह्यात नवाब मलिक यांच्यावर कारवाई का नाही? असा सवाल समीर वानखेडे (Sameer Wankhede IRS) यांनी दाखल केलेल्या याचिकेतून केला होता. त्या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी मुंबई पोलिसांनी ही हमी दिली.
आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी हायकोर्टात नवाब मलिक यांच्याविरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी) तक्रार दाखल केली आहे. नवाब मलिक यांच्याविरोधात 14 ऑगस्ट 2022 रोजी गोरेगाव पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीतंर्गत वानखेडेंनी तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी मलिक यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, या प्रकरणी मलिक यांना अद्यापपर्यंत अटक करण्यात आलेली नाही किंवा त्यांच्यावर आरोपपत्रही दाखल केलेलं नाही.
नवाब मलिक यांच्यावर मनी लॉड्रिंगचा आरोप असून ते सध्या वैद्यकीय जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे यांनी खोटी कारवाई करून शाहरूख खान कडून पैसे उकलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. हे सगळे प्रकरण नवाब मलिकांनी बाहेर आणलं. नवाब मलिकांनी आपल्यावर केलेले आरोप खोटे असल्याचं सांगत समीर वानखेडे यांनी त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर नवाब मलिक यांच्यावर दाऊदशी संबंधित प्रॉपर्टी खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता.
काय आहे मनी लाँड्रिंगचं प्रकरण?
मुनिरा प्लंबर आणि तिची आई यांची मालकी असलेल्या कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंड येथील मालमत्ता मलिक यांनी जवळपास दोन दशकांपूर्वी खरेदी केली होती. मात्र दाऊदची मुंबईतील हस्तक आणि बहिण हसीना पारकर, सलीम पटेल आणि सरदार खान यांनी ही जमीन मूळ मालकाकाला धमकावून हस्तगत केली होती. मलिकांना ही माहिती असूनही त्यांनी जाणीवपूर्वक हा व्यवहार केला. मलिक यांनी प्लंबरकडे या जागेबाबत कोणतीही चौकशी अथवा तथ्यांची पडताळणीही केली नाही, हे साक्षीदारांनी दिलेल्या जाबाबांवरून सिद्ध होत आहे. त्यामुळे नवाब मलिकांनी डी कंपनीसाठी हा व्यवहार करून त्यांन पैसे पुरवल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.
Aryan Khan Drugs Case : आर्यन खान प्रकरणात एनसीबीची नाचक्की
समीर वानखेडे यांनी कॉर्डिलिया क्रुझवर केलेल्या कारवाईत बॉलिवूड किंग शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती. आर्यन खान याच्याकडे ड्रग्ज सापडल्याचे सांगत एनसीबीने त्याला अटक केली होती. त्यामुळे आर्यन खानला बरेच दिवस तुरुंगात राहावे लागले होते. हे प्रकरण प्रचंड गाजले होते. मात्र, नंतरच्या काळात समीर वानखेडे यांनी आर्यन खान याला जाणीवपूर्वक या प्रकरणात गोवल्याचा आरोप करण्यात आला.
आर्यन खानला सोडण्यासाठी वानखेडे यांनी शाहरुख खानकडे 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचाही आरोप झाला होता. यामुळे एनसीबीची नाचक्की झाली होती. त्यामुळे समीर वानखेडे यांची एनसीबीच्या संचालकपदावरुन उचलबांगडी झाली होती आणि त्यांच्यामागे न्यायालयाचा ससेमिरा लागला होता.