Navratri 2022 : भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या नाशिकच्या सप्तशृंगी देवीच्या मंदिरात यंदा दसऱ्याच्या दिवशी पशुबळी देण्यास परवानगी दिल्याची माहिती राज्य सरकारनं नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे.
काय आहे याचिका -
पाच वर्षांपूर्वी, साल 2017 मध्ये बलिदानाच्या वेळी अचानक झालेल्या गोळीबारात 12 जण जखमी झाल्यानंतर मंदिराच्या आवारात दस-याच्या दिवशी होणा-या पशुबळी प्रथेवर बंदी घालण्यात आली होती. मात्र मंदिराच्या आवारात पशुबळी देण्यावर बंदी घालणारा उपविभागीय अधिकाऱ्यांचा 27 सप्टेंबर 2017 चा आदेश मागे घेण्यात यावा अशी मागणी करत आदिवासी विकास संस्थेनं हायकोर्टात याचिका केली होती.
या याचिकेवर नुकतीच न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी यंदा मंदिराच्या आवारात दसऱ्याच्या दिवशी पशुबळी देण्यास परवानगी देणार असल्याचे राज्य सरकारतर्फे हायकोर्टात सांगण्यात आलं. संस्थेनं यंदा या प्रथे दरम्यान सहा व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्याकडे दिला होता. तसेच फक्त एका बोकडाचा बळी देण्याची विनंतीही करण्यात आली होती. संस्थेच्या या प्रस्तावावर राज्य सरकारनं पशुबळीसाठी प्रमाणित कार्यप्रणाली हायकोर्टात सादर केली. तसेच याचिकाकर्ते या प्रमाणित कार्यप्रणालीची अंमलबजावणी करण्यास तयार असल्याचं सांगितलं. याची नोंद घेत हायकोर्टानं ही याचिका निकाली काढली.
काय आहे प्रथा -
प्राचीन काळापासून आदिवासी आणि इतर समुदाय काही धार्मिक दिवशी बकऱ्यांचा बळी देतात. हा विधी त्यांच्या धर्माचा अविभाज्य भाग आहे असा त्यांचा समज आहे. विधी पार पाडला नाही तर अघटित होईल, अशी गावकऱ्यांची धारणा असते. बलिदानानंतर हवेत गोळीबार करण्याचीही प्रथा आहे, असं हायकोर्टाला सांगण्यात आलं. मात्र अशाप्रकारे हवेत गोळीबार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं नमूद करून हायकोर्टानं गोळीबाराची परवानगी देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Navratri 2022: नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवीच्या कालरात्री रुपाचं पूजन; जाणून घ्या आख्यायिका