Navneet Rana Mumbai Police : मागासवर्गीय असल्याने पोलिसांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा दावा खासदार नवनीत राणा यांनी केला होता. याबाबतचे एक पत्र लोकसभा अध्यक्षांना लिहिले होते. नवनीत राणा यांना मुंबई पोलिसांवर हे आरोप करणे भोवणार असल्याची चर्चा आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्वीट करत खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना आदराची वागणूक देण्यात आली असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे नवनीत राणा यांचा 'दलित कार्ड'चा प्लॅन फेल झाला असल्याची चर्चा सुरू आहे. आता मुंबई पोलिसांवर खोटे आरोप केल्याप्रकरणी नवनीत राणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. 


नवनीत राणा यांचा पोलिसांविरोधात अँट्रासिटी केस दाखल करण्याचा प्रयत्न होता अशी माहिती सूत्रांनी दिली. तक्रार नोंदवणारे आणि तक्रार नोंदवून घेणारे अधिकारी एकाच प्रवर्गातील आहेत. राणा यांनी केलेल्या तक्रारीत खार पोलीस ठाण्यात चुकीच्या वागणुकीचा उल्लेख करण्यात आला. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास राणा यांना सांताक्रुझ पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राणा दाम्पत्य पोलीस ठाण्यात चहा घेत असल्याचा व्हिडीओ सादर ट्वीट केला. त्यानंतर आता मुंबई पोलीस आणखी एक व्हिडिओ समोर आणण्याच्या प्रयत्नात आहे. या व्हिडिओत नवनीत राणा यांना त्यांच्या मागणीनंतर प्रसाधनगृहात नेण्यात आले होते. प्रसाधनगृहाबाहेरील सीसीटीव्हीत हे दृष्य कैद झाले आहे. 


नवनीत राणा यांच्यावर मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करणे, पोलिसांवर खोटे आरोप करणे याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गृह खात्याचा याबाबतचा अहवाल लवकरच लोकसभा सचिवांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गृह खात्याच्या अहवालानंतर नवनीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: