Gunratan Sadavarte :  'सिल्वर ओक'वरील आक्रमक आंदोलन प्रकरणासह विविध आरोपात कारागृहात असलेले अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी तुरुंगात आता उपोषण आंदोलन सुरू केले. सदावर्ते सध्या ऑर्थर रोड तुरुंगात आहेत. त्यानी त्यासाठी उपोषण सुरू केले असल्याची माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली. 


पुण्यात दाखल असलेल्या एफआयआर प्रकरणात अटकपूर्व जामीनासाठी सदावर्ते यांनी हायकोर्टात अर्ज केला होता. पुण्यातील विद्यापीठ पोलीस ठाण्यात वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सदावर्ते यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी झाली. त्यावेळी सरकारी वकीलांनी सदावर्ते यांच्या उपोषणाची माहिती दिली. सदावर्ते यांनी अन्न न घेण्याचं ठरवलं असल्याची माहिती सरकारी वकिलांनी हायकोर्टाला दिली. जेलमध्येच त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. त्यामुळे ताबा मिळण्यात उशीर होत असल्याचे सरकारी वकील अरुणा पै यांनी सांगितले.


दोन समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केल्याबद्दल सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना अटकेपासून दिलासा दिल्यास ते बाहेर आल्यावर पुन्हा तेच कृत्य करण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद राज्य सरकारच्यावतीने करण्यात आला. पुण्यात 9 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा महिन्यांनी पोलीसांना कारवाईची आत्ताच गरज का वाटली? असा सवालच सदावर्ते यांचे वकील निरंजन मुंदरगी यांनी हायकोर्टात युक्तिवाद केला. एका वृत्तवाहिनीवर बोलताना एका समाजाबद्दल सदावर्तेंनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. ते त्यांनीच केलं होतं यासाठी त्यांच्या आवाजाचे नमुने घेणं गरजेचं असल्याचे सरकारी वकिलांनी म्हटले. मात्र सातारा पोलीसांनी याच संदर्भात दाखल अन्य गुन्ह्यात सदावर्तेंच्या आवाजाचे नमुने घेतल्यानं पुन्हा त्याची गरज काय? असा हायकोर्टाने सवाल केला. 


दरम्यान, पुण्यातील एफआयआरप्रकरणी सदावर्ते यांना मुंबई हायकोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. पुण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. एका वृत्तवाहिनीवर बोलताना मराठा समाजाबद्दल सदावर्तेंनी आक्षेपार्ह वक्तव्य  केलं होतं. त्यावरून पुण्यात त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.