नवी मुंबई : नवी मुंबईमधील वरिष्ठ सरकारी अधिकारी विकास रसाळ यांच्याकडे कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. विकास रसाळ हे कळंबोली येथील मुंबई महानगर लोखंड पोलाद बाजार समितीवर मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत आहेत. रसाळ यांच्याकडे तब्बल 14 कोटी 39 लाख 16 हजार 253 रुपयांची बेहिशेबी मालमत्ता मिळालेली आहे.

धक्कादायक म्हणजे विकास रसाळ यांच्याकडे उत्पन्नापेक्षा 208 टक्के अधिक संपत्ती आढळली आहे. या प्रकरणी एसीबीने रसाळ यांच्याविरोधात कळंबोली पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

विकास रसाळ हा अधिकारी गेल्या 8 महिन्यांपासून  कळंबोलीमधील मुंबई महानगर लोखंड पोलाद बाजार समितीवर कार्यरत आहेत. मुख्य कार्यकरी अधिकारी या पदावर प्रतिनियुक्तीवर रसाळ आले आहेत.

विकास रसाळ यांना आयकर विभागाच्या भरारी पथकाने पकडले असता त्यांच्याकडे 65 लाख 80 हजाराची रोख रक्कम सापडली.

आपल्याला बढती आणि चांगल्या ठिकाणी पोस्टिंग मिळावे यासाठी विकास रसाळ दिल्लीला गेले होते. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे असल्याची माहिती आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर मुंबई विमानतळावर रसाळ यांना ताब्यात घेण्यात आले. याच वेळेला त्याच्या घरावर आणि नातेवाईकांच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकले. यामध्ये तब्बल 14 कोटी 39 लाख 16 हजार 253 रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणी एसीबीने कळंबोली पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यात रसाळ यांची चौकशी सुरू करण्यात आली असून ठाणे एसीबीच्या माध्यमातून ही चौकशी सुरू आहे.

काही महत्वाची कायदपत्रं एसीबीच्या टीमने ताब्यात घेतली आहेत. अनेक ठिकाणी बेनामी मालमत्ता रसाळ यांनी तयार केलेल्या आहेत. याचाही शोध घेतला जात आहे.

दरम्यान, विकास रसाळ गेल्या आठ महिन्यांपासून लोखंड पोलाद बाजार समितीवर कार्यरत आहे. त्यांचा कारभार पाहता लोकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

सर्वसामान्य लोकांना भेटी नाकारणारे रसाळ फक्त ठेकेदार आणि कंपणी मालकांनांच भेटण्यात धन्यता मानतात. त्याच बरोबर लोखंड-पोलाद बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम होत असून यावर नियंत्रण ठेवलेले नाही. उद्यानासाठी राखीव असलेल्या जागेचा वापर इतर कामासाठी होत असूनही प्रशासन कारवाई करीत नाही. विकास रसाळ याने याआधी मुंबई आणि उपनगरातील सहकारी सोसायट्यांवर विभागीय निबंधक म्हणून काम केलेले आहे.