नवी मुंबई : नवी मुंबईतील बँक ऑफ बडोदाच्या दरोड्यात चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी 10 लाखांचं सोनं परत मिळवण्यात पोलिसांना यश आलं आहे. सानपाडा पोलिस आणि क्राईम ब्रान्चच्या पथकाने या जबरी दरोड्याप्रकरणी चार जणांना अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी 50 तोळे (500 ग्रॅम) सोन्याचे दागिने नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावातून परत मिळवले.


सोन्याचं काम करणाऱ्या संजय वाघ नावाच्या इसमाला नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं.

13 नोव्हेंबर रोजी जुईनगर सेक्टर 11 मधील बँक ऑफ बडोदाच्या शाखेतील 30 पैकी 28 लॉकर्स दरोडेखोरांनी फोडले. या जबरी दरोड्यात 3 कोटी 19 लाख रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाल्याची नोंद सानपाडा पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये सोन्याचे, चांदीचे, हिऱ्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश आहे.

भुयार खोदून बँकेवर दरोडा, चोरट्यांनी कितीचा मुद्देमाल लुटला?

पोलिसांनी अटक केलेल्या चार जणांची भूमिका या दरोड्यात मर्यादित होती. भुयारातील ढिगारा बाहेर काढून जुईनगर रेल्वे स्टेशनजवळच्या खुल्या मैदानात जाऊन फेकणं हे त्यांचं काम होतं. हे मैदान बँकेपासून 200 मीटर अंतरावर आहे.

दरोड्यानंतर लुटलेले दागिने मुंबईतील ज्या सराफांना विकले, त्यांच्याकडे हे चौघे पोलिसांना घेऊन गेले. त्यामुळे फक्त 10 लाख किंमतीचे 500 ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांना परत मिळाले. मजुरीचं काम केल्याने चोरीमधील थोडीच रक्कम मिळाल्याचं अटक केलेल्या चार जणांनी सांगितलं.

मोठं भुयार खोदून बँक लुटली, नवी मुंबईत जबरी दरोडा

सूत्रांच्या माहितीनुसार, "नालासोपाऱ्यातील 30 वर्षीय दीपक मिश्रा हा या दरोड्याचा मास्टरमाईंड असल्याची शक्यता आहे. तर नालासोपाऱ्यातीलच 40 वर्षीय कमलेश हादेखील या दरोड्यामधील संशयित आहे. ह्या दोघांकडून 3.19 कोटींपैकी 2 कोटींची रक्कम परत मिळू शकते, असं अंदाज आहे."

दरम्यान, पोलिसांच्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी 2.79 कोटींचं 11.40 किलो सोनं, 20.67 लाखांची  6.9 किलो चांदी, 70 हजार रुपये रोख आणि 50 हजार रुपये किंमतीची एक हिऱ्याची अंगठी लांबवली.

बँक दरोड्यासाठी खोदलेल्या भुयाराचा व्हिडीओ हाती