मुंबई: डोंबिवली एमायडीसीतल्या एका कंपनीत आज सकाळी स्फोट झाला. या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राजेंद्र जावळे असं या कामगाराचं नाव आहे.
आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास एमआयडीसी फेज २ मधल्या ऍल्यूफिन कंपनीत स्फोट झाला. कंपनीतल्या कम्प्रेसरमध्ये झालेल्या या स्फोटात राजेंद्र जावळे गंभीर जखमी झाले होते. या स्फोटात त्यांचा पाय तुटला होता.
त्यांच्यावर एमआयडीसीतल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, डोंबिवली एमआयडीसीत मागच्या वर्षभरातली ही तिसरी स्फोटाची घटना आहे. यापूर्वी गेल्या वर्षी एमआयडीसीतल्या प्रोबेस कंपनीत भीषण स्फोट झाला होता, तर याच वर्षी ऑगस्ट महिन्यात फेज2२ मधल्याच इंडो अमाईन कंपनीतही स्फोट झाला होता.
प्रोबेस स्फोटानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी डोंबिवली एमआयडीसीतल्या रासायनिक कंपन्यांचं स्थलांतर करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नसून त्यामुळं डोंबिवलीकर येणारा प्रत्येक दिवस भीतीच्या छायेत जगतायत.