नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृपने नवी मुंबईतील खारघरवासियांची खड्ड्यांच्या विघ्नातून सुटका झाली आहे. खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर पंतप्रधान मोदींची जाहीर सभा आहे. त्यामुळे खारघर आणि आसपासचे रस्ते चकाचक करण्यात आले आहेत.


मोठमोठ्या खड्ड्यांमुळे खासघरवासी अनेक महिन्यांपासून मेटाकुटीला आले होते. सर्वच भागातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य असल्याने गाड्या कुठून आणि कशा चालवायच्या असा प्रश्न निर्माण झाला होता. सिडको आणि महापालिकेकडे तक्रार करुनही, ना प्रशासन लक्ष देत होतं ना लोकप्रतिनिधी. मात्र आज चक्क पंतप्रधानच खारघरमधील नागरिकांच्या मदतीसाठी धावून आले.

नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर खारघरसह जवळपासचे सर्वच रस्ते चकाचक करण्यात आले आहेत. रस्त्यांवर पडलेले सर्व खड्डे बुजवण्याची लगीनघाई जोरात सुरु आहे. मोदींमुळे का असेना, पण पाचवीला पुजलेल्या खड्ड्यांचं विघ्न दूर झाल्याची भावना वाहनधारकांमध्ये आहे.