मुंबई : आरेची देखभाल करणाऱ्या डेअरी विभागाने एमएमआरडीएला आरेत मेट्रो भवन बांधण्याची परवानगी दिल्याने आता प्रत्यक्षात मेट्रो भवन निर्मितीच्या कामाला सुरुवात झाली आहे. पण बांधकाम केल्या जाणाऱ्या  ठिकाणी अजूनही 70 झाडे तोडली जाण्याची शक्यता असल्याने पर्यावरण प्रेमींकडून याला तीव्र विरोध सुरुच आहे. मात्र प्राधिकरणाने दावा केला आहे की, या कामामुळे पर्यावरणास कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही.


आरेत मेट्रो भवन ही 32 मजली इमारत बांधली जाणार असून, या ठिकाणाहून मुंबईतील मेट्रोच्या चौदा मार्गांवर नियंत्रण ठेवण्याचे काम केले जाणार आहे. यातील एक मार्ग सध्या पूर्ण झाला असून उर्वरित 13 मार्गांचे काम प्रगतीपथावर आहे. मुंबईत 337 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग विस्तारले जाणार आहे. 11 ऑक्टोबरला डेअरी विभागाने प्राधिकरणाला पत्राद्वारे 2.03 हेक्टर क्षेत्रावर मेट्रो भवन आणि मेट्रोच्या इतर वापरासाठी बांधकाम करण्यास परवानगी दिली असल्याची माहिती मेट्रो अधिकाऱ्यानी दिली.

बांधकाम करण्यासाठी जेवढ्या जागेवर परवानगी दिली आहे, तेवढ्याच जागेवर बांधकाम करावे. बांधकाम क्षेत्रालगतच्या  नैसर्गिक संपत्तीला कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही, तसेच अनधिकृत बांधकाम करु नये याची काळजी एमएमआरडीएने घ्यावी. जसेजसे बांधकाम पुढे जाईल त्या प्रत्येक टप्प्याची माहिती आरे डेअरी विभागाला द्यावी, डेअरी विभागाचे अधिकारी ही वेळोवेळी बांधकामांचा आढावा घेतीला आणि त्यांना प्राधिकरणाने सहकार्य करावे या अटींवर डेअरी विभागाने एमएमआरडीएला मेट्रो भवन बांधकाम करण्यास परवानगी दिली असल्याची मेट्रो रेल कार्पोरेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.