कोपरखैरणेमध्ये बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास मराठा मोर्चाला हिंसक स्वरुप प्राप्त झालं. यावेळी आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली. त्या दगडफेकीत एक तरुण गंभीर जखमी झाला होता.
उपचारासाठी तरुणाला मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु होते. काल सकाळी त्याने उपचारांना साथ देणं सोडलं. सकाळी 11 वाजताच्या सुमारास तरुणाने अखेरचा श्वास घेतल्याची माहिती जेजे रुग्णालय प्रशासनानं दिली आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नवी मुंबईतील आंदोलनात हिंसा घडवणाऱ्या 56 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कळंबोली, वाशी, कोपरखैरणे आंदोलनातील काही लोकांना नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे यामध्ये अनेक जण परप्रांतीय असल्याचं उघड झालं आहे.
सध्या या भागातील परिस्थिती नियंत्रणात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काही कंपन्यांनी खारघर परिसरात इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत. तसे मेसेज कंपनीने ग्राहकांना पाठवले आहेत.